मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातच नजरकैदेत! दिल्ली पोलिसांवर ‘आप’चा गंभीर आरोप

नवी दिल्ली । दिल्लीच्या सीमेवर गेल्या 12 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. त्यांच्या या हाकेला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेससह आम आदमी पक्षानं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Delhi Chief Minister Arvind Kejriwal in House arrest)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर काल सिंधू बॉर्डरवर जात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. केंद्र सरकार शेतकऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव आखत होतं. पण आम्ही त्यांचा डाव यशस्वी होऊ दिला नाही, असा दावा केजरीवाल यांनी दिला आहे. केजरीवाल यांनी काल आंदोलकांची भेट घेतल्यानंतर त्यांना आज नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. केजरीवाल आज पुन्हा भारत बंदमध्ये रस्त्यावर उतरले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या भीतीनं ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरातच स्थानबद्द केलं आहे. त्यांच्या घरी कोणालाही जाऊ दिलं जात नाही, तसेच त्यांनाही घरातून बाहेर पडू दिलं जात नाही. केजरीवाल यांच्यासमवेत ज्या आमदारांनी सोमवारी बैठक घेतली, त्या आमदारांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे कार्यकर्तेच केजरीवाल यांच्या घराबाहेर नजर ठेऊन बसल्याचे आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटलंय.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मदतीने भाजपाने दिल्लीत तिन्ही महापालिकांच्या महापौरांना अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आंदोलनास बसवले आहे. या आंदोलनाच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांना तैनात करण्यात आले असून दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर बॅरिकेट्स लावले आहेत. एकप्रकारे केजरीवाल यांना घरातच स्थानबद्ध करण्याचं काम भाजपाने दिल्ली पोलिसांच्या मदतीने केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

दिल्ली पोलिसांनी फेटाळले आरोप
दरम्यान, दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी अंटो अल्फोस यांनी आम आदमी पक्षाचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच, दिल्ली पोलिसांवर केलेला आरोप बिनबुडाचा असून अरविंद केजरीवाल हे सोमवारी रात्रीही घराबाहेर पडले होते. विशेष म्हणजे ते रात्री 10 वाजता घरी परतले आहेत, असेही अल्फोस यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’