हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) नेहमीच चर्चेत असते. कन्याकुमारी ते काश्मीर असा एकूण ४००० किलोमीटर प्रवास पायी करत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) थेट देशातील जनतेचा संवाद साधला, त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि लोकांना आपलं प्रेम दिले. आता याच भारत जोडो यात्रेबद्दल राहुल गांधींना अमेरिकेत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्टपणे या यात्रेचा हेतू आणि उद्देश सांगितला. तसेच भारत जोडो यात्रेदरम्यान आलेला अनुभव सुद्धा राहुल गांधींनी व्यक्त केला.
राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी डॅलस, टेक्सास येथील टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांची भेट घेतली. या कार्यक्रमात त्यांना भारत जोडो यात्रेबद्दल विचारलं असता राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रा काढण्याचे मुख्य कारण म्हणजे जनतेशी माझ्या संवादाचे सर्व मार्ग बंद झाले होते. आम्ही संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते टीव्हीवर दाखवलं जात नव्हते. मी माध्यमांशी संपर्क साधला, पण त्यांनी आमचे ऐकले नाही. “आम्ही कायदेशीर संस्थांना कागदपत्रे देखील सादर केली, परंतु कोणताही परिणाम झाला नाही. अशाप्रकारे सर्वच मार्ग बंद झाल्याने मग जनतेपर्यंत पोहचायचं कस हेच आम्हाला कळत नव्हतं. मग त्यांचा मनात विचार आला कि, जर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेशी जोडलं जात नसेल तर आता आपल्याला स्वतःहून थेट जनतेपर्यंत जावे लागेल. त्यासाठी देशभरात पायी प्रवास करणे हाच उत्तम मार्ग होता.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, सुरुवातीला गुडघ्याच्या त्रासामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पहिल्या 3-4 दिवसांतच वाटलं कि आपण कशाला भारत जोडो यात्रा काढली. मात्र त्यानंतर शरीराला चालण्याची सवय होत गेली. राहुल गांधी यांच्या मते भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींचे राजकारण, लोक आणि संवादाचा मार्ग पूर्णपणे बदलला. भारत जोडो यात्रेमुळे राजकारणात प्रेम’ या संकल्पनेची ओळख झाली. राजकारणात सामान्यतः ‘प्रेम’ सारखे शब्द वापरले जात नाहीत, उलट द्वेष, राग, अन्याय आणि भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टी प्रमुख असतात. पण, भारत जोडो यात्रेने या नव्या कल्पनेला भारतीय राजकारणात स्थान दिले आहे आणि प्रेमची ही कल्पना चांगलीच कामी आली आहे. भारत जोडो यात्रा हा काही फक्त भौतिक प्रवास नव्हता, तर हा एक आध्यात्मिक आणि राजकीय प्रवास होता ज्याने त्यांचा आणि त्यांच्या टीमचा दृष्टिकोन बदलला असेही राहुल गांधी यांनी सांगून टाकलं.