भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातून सुपुत्र संतोष दानवे यांची आमदारकी गेल्यात जमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अस्सल रांगडी भाषा, कार्यकर्त्यांच्या मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव, अगळ पगळ राहूनही चाळीस वर्षांचा राजकीय आलेख चढत्या भाजणीचा ठेवणारे आणि विरोधकांना चकवा देण्यात एक्स्पर्ट असणारे रावसाहेब दानवेंनाच यंदा जनतेनं चकवा दिला आणि घरी बसवलं… परमनंट खासदार माजी झाले… अर्थात जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाची झळ त्यांना बसली हे वेगळ्या भाषेत सांगायचा नको… पण आता दानवेंच्या पराभवानंतर त्यांच्या विरोधकांनी मोर्चा वळवलाय तो त्यांच्या सुपुत्रांच्या भोकरदन जाफ्राबाद या विधानसभा मतदारसंघाकडे… मागील दोन टर्म आमदार असणारे दानवेंचे चिरंजीव संतोष दानवे भाजपच्या तिकिटावर इथून निवडून येतायत पण अगदी काठावरच्या लीडने… म्हणूनच दानवेंच्या पॉलिटिकल करिअरला खीळ घालण्यासाठी आता त्यांच्या मुलाला काहीही झालं तरी पाडायचंच, असा जणू चंगच विरोधकांनी बांधलाय… आणि अर्थातच या सगळ्यात फ्रंटला नाव आहे ते राजाभाऊ देशमुख यांचं… वडिलांपाठोपाठ बालेकिल्लातच मुलाला पराभवाचा धक्का देण्याचा करिष्मा विरोध करतील का? वडिलांच्या पराभवाचा वचपा आमदारकीची हॅट्रिक मारून संतोष दानवे पूर्ण करतील का? दानवेंच्या मुलाची आमदारकीसाठी चहुबाजूने विरोधकांनी कोंडी कशी केलीये? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…

ज्यांना प्रेमानं दाजी म्हटलं जातं ते जालन्याचे परमनंट आमदार रावसाहेब दानवे यांचा अखेर काँग्रेसच्या कल्याण काळेंनी पराभव केला… अर्थात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दानवेंना पाडण्यासाठी लावलेली फील्डिंग यात महत्त्वाची ठरली… दानवेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच राजाभाऊ देशमुख यांनी विद्यमान आमदार काळे यांच्या मदतीने सध्या आपला मोर्चा वळवलाय तो दानवे सुपुत्र भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाकडे… खरंतर दानवे कुटुंबाची राजकीय पाळमुळच भोकरदनमधून घट्ट रोवली गेली… भाजपचे बहुमत नसताना काँग्रेसच्या दोन सदस्यांच्या पाठिंब्यावर पंचायत समितीच्या सभापतीची खुर्ची बळकावून रावसाहेब दानवेंनी अगदी सुरुवातीलाच तालुक्याला आपल्या राजकीय ताकतीची चुणूक दाखवून दिली होती… 1985 ला पहिल्यांदाच त्यांनी विधानसभेला सामोरे जाण्याचं धाडस दाखवलं… पण पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला… पण तोही अगदी अल्पशा मताने… या पराभवाची व्याजासहित वसुली दानवेंनी 1990 ला करून घेतली… काँग्रेसच्या रंगनाथ पाटील यांचा 25 हजारांहून अधिकच्या लिडने दानवेंनी पराभव केला… आणि तेव्हापासून 2019 पर्यंत दानवेंच्या विजयाची घोडदौड कुणालाही रोखता आली नव्हती… 1999 पासून दानवे जालन्यातून लोकसभेवर गेले असले तरी भोकरदनवरची आपली करडी नजर त्यांनी कधी हटू दिली नव्हती… दानवे म्हणतील तोच आमदार, अशी या मतदारसंघाची एकूण परिस्थिती होती…

भोकरदन जाफ्राबाद मध्ये सुपुत्र Santosh Danve यांची आमदारकी गेल्यात जमा । Bhokardan Vidhan Sabha

पण दानवेंच्या वर्चस्वाला पहिला धक्का बसला तो 2003 साली… भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या विठ्ठलराव सपकाळ यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे सुपुत्र चंद्रकांत दानवे हे राष्ट्रवादीकडून उभे राहिले… तेव्हाही काँग्रेसच्या राजाभाऊ देशमुख यांनी त्यांना निवडून आणण्याचा शब्द दिला… आणि राष्ट्रवादी भोकरदनमधून निवडून आली देखील… हाच तो क्षण होता जेव्हापासून भोकरदनमध्ये दानवे विरुद्ध दानवे या संघर्षाला तोंड फुटलं… यानंतर एक ट्रेंड कायम बघायला मिळाला… भाजपकडून दानवेंच्या कुटुंबातील व्यक्ती विरुद्ध राष्ट्रवादीकडून चंद्रकांत दानवे अशी सरळ लढत होऊनही रावसाहेब दानवे हे अवघ्या एक दोन हजारांच्या लीडने भोकरदनची आमदारकी जिंकत आले… थोडक्यात खासदारकीला दानवे निवडणूक वन साईड मारत असले तरी भोकरदनची जागा जिंकण्यासाठी त्यांना भारी धडपड करावी लागत होती…

2009 च्या निवडणुकीत दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मला दानवे यांना भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरवलं… यावेळी तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत दानवे यांनी निर्मला दानवे यांचा एक हजार 639 मतांनी पराभव करत रावसाहेब दानवेंच्या वर्चस्वाला पुन्हा आव्हान दिलं… पत्नीचा पराभव दानवेंच्या चांगलाच जिव्हारी लागला असणार म्हणूनच 2014 दानवेंनी आपला मुलगा संतोष दानवे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं… आणि भाजपच्या लाट असूनही अवघ्या साडेसात हजार मतांच्या निसटत्या लीडने संतोष दानवे यांचा विजय झाला… 2019 लाही निवडणूक घासून होणार याची रावसाहेब दानवेंना कल्पना होती… त्यामुळे लोकसभेचा गड जिंकून देखील मुलाच्या विजयासाठी मागच्या टर्मला दानवे मतदारसंघात तळ ठोकून होते… या रे या सारे या म्हणत दानवे साहेबांनी राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांचं भाजपात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग घडवून आणलं… प्रचारात ते महिनाभर भोकरदन मध्ये तळ ठोकून होते… या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय तब्बल 32 हजारच्या लीडने संतोष दानवे यांचा विजय झाला… चंद्रकांत दानवेंसाठी हा पराभवाचा सलग दुसरा धक्का होता…

कट टू 2024. राज्याच्या राजकारणात ज्या काही उलथापालथी झाल्याचे परिणाम भोकरदन जाफराबाद मतदारसंघातही पाहायला मिळतायत… महायुती सरकारच्या विरोधातील वातावरण, मराठा आरक्षणाची लाट आणि त्याचा सेंटर पॉईंटच जालना असल्यामुळे परमनंट खासदार दानवेंना पराभवाचा धक्का बसला… लोकसभेच्या पराभवानं किमान भोकरदनमध्ये तरी आपला निभाव लागेल का? असा प्रश्न पडून दानवे कुटुंब सध्या सेल्फ डाऊट मध्ये असणार… त्यामुळे आपण पडलो तरी मुलाचं राजकारण जिवंत ठेवायचं, यासाठी दानवे धडपड करत असताना त्यांच्या मुलाला काहीही केल्या पाडायचंच, यासाठी विरोधकांनी आता मोर्चे बांधणी केलीय…इंटरेस्टिंग गोष्ट अशी की विधानसभेच्या जागा वाटपाचा कार्यक्रम होण्याच्या आधीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधानसभेचा आपला पहिली उमेदवारी मयूर बोर्डे यांना डिक्लेअर करून भोकरदनच्या विधानसभेसाठी मोठी रंगत आणलीय… शेतीप्रश्न आणि त्या संबंधित आंदोलनांचा बोर्डे यांचा इतिहास असल्याने ते इथून संतोष दानवेंना कितपत फाईट देतील? ते पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे…

दुसऱ्या बाजूला लोकसभेला दानवेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातला आपला वावर वाढवला आहे… पारंपारिक लढत राष्ट्रवादी देत असल्याने शरद पवार गटाकडे महाविकास आघाडीत ही जागा जाणार असल्यामुळे तुतारीकडून चंद्रकांत दानवे यंदाही इच्छुक असतीलच… पण काँग्रेसच्या राजाभाऊ देशमुखांनी या जागेची आग्रही मागणी केल्यामुळे यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तिकीट वाटपात मोठा संघर्ष उभा राहू शकतो…

राजाभाऊ देशमुख आणि त्यांचे देशमुख कुटुंब हे सुरुवातीपासूनच काँग्रेसचे एकनिष्ठ समजले जातात… त्यांचे वडील एडवोकेट भाऊसाहेब देशमुख यांचे थेट गांधी घराण्याशी संबंध असणारे ते एकमेव माजी खासदार होते… त्यांचाच वारसा राजाभाऊ पुढे चालवतायेत… तसं बघायला गेलं तर रावसाहेब दानवे हे देशमुखांचे कट्टर राजकीय विरोधक… म्हणूनच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांच्या पाठीशी सारी ताकद देशमुख यांनी लावली होती… दानवेंचा हा ऐतिहासिक पराभव राजाभाऊ देशमुख यांच्या ताकदीमुळेच शक्य झाला होता… आता तेच राजाभाऊ विधानसभेला थेट रावसाहेब दानवेंच्या मुलालाच भिडणार असल्यामुळे भोकरदन जाफराबाद ही जागा हाय व्होल्टेज लढतीमध्ये सर्वात फ्रंटला असणार आहे… त्यातही लोकसभा निवडणुकीत आपल्या वडिलांनाच संतोष दानवे भोकरदन मधून लीड देऊ शकले नाहीयेत… याचा अर्थ विद्यमान आमदार संतोष दानवे हे गॅसवर आहेत… विरोधकांची झालेली एकजूट पाहता निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागणार, ते तर कन्फर्म आहे… पण संतोष दानवे यांच्या विरोधात पारंपारिक प्रतिस्पर्धी चंद्रकांत दानवे की काँग्रेसचे राजाभाऊ देशमुख यांना तिकीट मिळतंय, ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच…