भोसरीत हा चेहरा लढत देईल, पण महेश लांडगेंना हरवण अवघडय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येणाऱ्या विधानसभेला महेश लांडगे भोसरी विधानसभेतून आरामात आमदारकी काढतील, असा अंदाज असताना शरद पवारांनी एक खेळी केली… आणि पुन्हा फासे पलटले… पक्ष फुटीनंतर इरसाल पेटलेले आणि लोकसभेच्या विजयानंतर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी फिल्डिंग करता करता पवारांनी आता भोसरी विधानसभेकडेही विशेष लक्ष दिलय… भाजपच्या महेश लांडगेंच्या येणाऱ्या विधानसभेतील विजयाच्या कॉन्फिडन्सची हवा बाहेर काढण्यासाठी पवारांनी आपल्या माणसाला भोसरीमध्ये बळ द्यायला सुरुवात केलीय… सलग दोन टर्म आमदार असल्यामुळे प्रस्थापित झालेल्या लांडगेंना चितपट करण्यासाठी शरद पवार नेमकी काय स्टेटर्जी आखतायेत? भोसरी विधानसभेचा वर्तमान टू इतिहास व्हाया राजकारण असा इंटरेस्टिंग आढावा…

2009 ला भल्यामोठ्या हवेली विधानसभा मतदारसंघातून स्वतंत्र भोसरी विधानसभा अस्तित्वात आला… लोकसभेला शिरूर मतदारसंघात मोडणाऱ्या भोसरीचे पहिले आमदार होण्याचा मान मिळाला तो विलास लांडे यांना… राष्ट्रवादीने मंगला कदम यांना तिकीट दिल्याने लांडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून ते भोसरीतून निवडून आले… 2014 ला ही असंच काहीसं घडलं… पण यावेळेस स्टँडिंग आमदार म्हणून राष्ट्रवादीने लांडे यांना तिकीट दिलं.. पण इथून पक्षाचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष असणाऱ्या महेश लांडगे यांनी बंडखोरी केली.. आणि ते अपक्ष म्हणून निवडून आले… थोडक्यात अपक्षांना निवडून देणारा मतदारसंघ म्हणून भोसरीची काही काळ ओळख बनली होती…

YouTube video player

पुढे लांडगेंनी भाजपशी संधान साधत पक्षात प्रवेश केला… आणि 2019 ला राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना पराभूत करून अनेक वर्षानंतर अपक्षांचा मतदारसंघ म्हणून भोसरीची ओळख पुसण्यात लांडगेंना यश आलं… पुढे बैलगाडा शर्यत, कुस्ती स्पर्धा, हिंदुत्वाची लाईन आणखीन गडद करत त्यांनी चालवलेली आंदोलन आणि विविध कार्यक्रम पाहता त्यांचा एक ठरावीक व्होट बँक आजही मतदार संघात पाहायला मिळतो… म्हणूनच लोकसभा निवडणुकीतही त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी लीड दिलं… या आकड्यातून हे क्लियर होतं की येणाऱ्या विधानसभेला महेश लांडगे यांचं पारड सध्यातरी जड आहे… पण रंगात आलेला डाव फासा टाकून उलटा कसा करायचा? याची परफेक्ट माहिती असणाऱ्या पवारांनी भोसरीसाठी फिल्डिंग लावली.. आणि मतदारसंघात नवा ट्विस्ट आला…

अजित पवार गटाचे नेते अजित गव्हाणे यांनी काही नगरसेवकांसह शरद पवार गटात प्रवेश केला. विधानसभा निवडणुक लढवण्याच्या दृष्टीनेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं. अजित पवार गटाने आधी – घड्याळ तेच, वेळ नवी असं घोषवाक्य तयार केलं होतं. गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता वेळ आली आहे बदल घडवण्याची… ही टॅगलाईन वापरायला सुरुवात केली. महायुतीत सध्या ज्या पक्षाचा आमदार आहे त्यालाच जागावाटपात संधी मिळेल हे गणित जवळपास पक्कं आहे. त्या नियमाने भोसरीची जागा भाजपला आणि पर्यायाने महेश लांडगे यांनाच मिळणार हे निश्चित होतं. त्यामुळे अजित पवार गटात राहून आपण उमेदवारी मागू शकणार नाही, किंबहुना पक्षाला ते मान्य नसेल याचा अंदाज आल्यानेच गव्हाणे यांनी पक्ष बदलला. पक्ष बदलत असताना त्यांनी १५ हून अधिक नगरसेवक सोबत नेल्याने गव्हाणे यांची ताकद मोठी आहे हे लक्षात आलं. महेश लांडगे यांच्या एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीमुळे भाजप आणि इतर पक्षातील नेते त्यांच्यावर नाराज असल्याचं अजित गव्हाणे यांचं म्हणणं आहे. शिवाय मागील १० वर्षांत भोसरीमध्ये कुठल्याही सुधारणा झाली नसल्याची तक्रार गव्हाणे करतात.

मात्र महेश लांडगे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले विलास लांडे अद्यापही अजित पवार गटातच आहेत. महायुतीत अजित पवारांच्या समावेशानंतर अनेक गणितं बदललेली आहेत. अनेक भाजप नेते अजित पवारांवर नाराज असल्याचं उघडपणे बोललं जातं…कट्टर विरोधक असताना एकमेकांशी जुळवून घेण्याची किमया मागील काही वर्षांत लांडगे आणि लांडे यांना करावी लागली आहे. मात्र निवडणुकीच्या आधी विलास लांडे हे शरद पवार गटात प्रवेश करतील किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम करतील अशी चर्चा, कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे…

अजित गव्हाणे यांच्याव्यतिरिक्त शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे सुलभा उबाळे या निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. २००९ आणि २०१४ ची निवडणुक लढवलेल्या उबाळे पराभवानंतरही शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या. २००९ च्या निवडणुकीत विलास लांडे यांच्याकडून अवघ्या २ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. २०१९ ची निवडणुक त्यांनी लढली नाही, मात्र मागील काही काळापासून त्या मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत… तरी करंट स्टेटस पाहिलं तर विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या बाजूने कौल दिसत असला तरी अजित गव्हाणे यांनी त्यांच्या विरोधात रान तापवल्याने आणि सोबतच विलास लांडे, सुलभा काळे यांचीही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आल्याने विरोधकांनी एकत्रित काम केल्यास इथे लांडगे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो…बाकी महेश लांडगे यांना येणाऱ्या विधानसभेला पाणी पाजण्याची कुमक कोणत्या राजकीय नेत्यामध्ये आहे? तुम्हाला काय वाटतं? भोसरी चा पुढचा आमदार कोण? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…