हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तस तस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नवनवीन डावपेच टाकत भाजपला घायाळ करत आहेत. कालच शरद पवारांनी माढ्यात मोहिते- पाटील कुटुंबाला पक्षात सामील करून घेतल्यानंतर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर (BhushanSinh Raje Holkar) हे सुद्धा पवारांची तुतारी हाती घेणार आहेत. भूषणसिंह होळकर हे शरद पवार गटाचे स्टार प्रचारक सुद्धा असतील असेही बोललं जात आहे. त्यामुळे शरद पवारांची ताकद वाढणार आहे हे नक्की…
शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर भूषणसिंह होळकर यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदीही निवड होणार असल्याचे बोललं जात आहे. यात महत्वाची बाब म्हणजे ३ वर्षांपूर्वी याच भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद चांगलाच गाजला होता. त्यावेळी शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पणाला विरोध करण्यात आला होता. तेव्हा भूषणसिंह यांनी, होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा असल्याचा आरोप केला होता. मात्र, आता तेच भूषणसिंह होळकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी बेजरेच्या राजकारणातून आपल्या विरोधकाला स्वतःच्या बाजूने वळवण्यात यश मिळवलं आहे असं बोललं जातंय.
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून शरद पवारांनी विरोधकांच्याच घरी जाऊन आपले डाव टाकायला सुरुवात केली आहे. याआधी शरद पवारांनी बारामती यामधील अनंत थोपटे, चंद्रराव तावरे आणि काकडे कुटुंबीयांची भेट घेऊन राजकीय शत्रुत्त्व संपवून टाकलं होते. पवारांनी माढ्यात सुद्धा मोहिते पाटील कुटुंबियांना आपल्याकडे वळवून भाजपला पश्चिम महाराष्ट्रात हादरा दिला आहे. बीडमध्ये बजरंग सोनवणे याना आपल्या गटात प्रवेश देऊन पंकजा मुंडेंना आव्हान दिले, रावेर म्हणून श्रीराम पाटील याना तिकीट दिले. जस जस निवडणूक जवळ येत आहे तस तस शरद पवार आणखी काही नेते आपल्या गळाला लावत आहेत. पवारांच्या या खेळीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.