मराठा आरक्षणासाठीची लढाई थांबवणार!! मनोज जरांगे यांची मोठी घोषणा

0
1
manoj jarange patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणाला बसले होते. मात्र अखेर आज त्यांनी आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्येत खालावत असूनही मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या जरांगेंना अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आंदोलन मागे घेत त्यांनी मराठा समाजाने डोळे उघडावेत, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

सरसकट ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले होते. पाच दिवसांच्या उपोषणानंतरही सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागेल, असे वाटले नव्हते,” असे यावेळी ते म्हणाले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निर्णय

मस्साजोग गावाचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मंगळवारी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली. राज्यात या प्रकरणावरून वातावरण तापलेले असताना, जरांगेंचे उपोषणही सुरू होते. मात्र, संतोष देशमुख प्रकरणावरून जनतेचे लक्ष हटू नये, म्हणूनच आपण उपोषण मागे घेत असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत मनोज जरांगे म्हणाले की, “खरं आहे ते टिकत नाही आणि जे हक्काचं आहे ते मिळत नाही. फडणवीस यांनी आरक्षणासंदर्भात होय किंवा नाही असे स्पष्टपणे सांगितलेले नाही. ते गप्प बसले आहेत, याचा अर्थ त्यांच्या मनात मराठा समाजाविषयी किती द्वेष आहे हे स्पष्ट होते.” तसेच, झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग यावी म्हणून आपण आंदोलन सुरू केले होते, मात्र सरकारकडून वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.

दरम्यान, आतापर्यंत अनेक आंदोलने करूनही सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने, आता आरक्षणासाठीची लढाई थांबवणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. मात्र, पुढील वाटचाल काय असेल, याचा निर्णय समाजाशी चर्चा करून घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.