औरंगाबाद – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्राध्यापक भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात प्राध्यापक आणि प्राचर्य भरतीला मंजुरी मिळाली आहे. तसंच 5 हजार हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करु, अशी घोषणाच उदय सामंत यांनी केली आहे. राज्यात 8 हजार प्राध्यापकांची भरती 7 महिन्यात पूर्ण केली जाईल. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून हे प्राध्यापक रुजू होतील, असं सामंत यांनी जाहीर केले आहे. विद्यापीठ महाविद्यालयांना पत्र पाठवून अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करण्यासाठी सूचना करेल, असं आश्वासनही सामंत यांनी दिलं आहे. ते आज विद्यापीठात पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून केली जात आहे. यासाठी राज्यात पुणे, मुंबई तसेच इतर जिल्ह्यांत आंदोलनदेखील करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्राध्यापक भरतीबाबत महत्वनाचा निर्णय घेतला आहे दोन दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे त्याबाबत महत्वाची माहिती दिली होती. राज्यात पहिल्या टप्यातील 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता देण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, राज्यात गेल्या अकरा वर्षांपासून प्राध्यापक भरती नियमितपणे झालेली नाही. राज्यातील महाविद्यालयातील पन्नास टक्के जागा रिक्त असल्यानं शिक्षणावर परिणाम होत आहे. सेट नेट परीक्षांचं आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. आता मात्र उशिराने का होईना पण प्राध्यापक भरतीला मान्यता मिळालेली आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून आता प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरु होण्याची वाट पाहिली जात आहे.