भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि इंडिगो या प्रमुख विमान कंपन्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत या कंपन्यांनी मंगळवार, १३ मे रोजीच्या काही महत्त्वाच्या शहरांतील उड्डाण सेवा रद्द केल्या आहेत. या निर्णयामुळे श्रीनगर, चंदीगड, अमृतसर, जम्मू, लेह, राजकोट आणि इतर काही शहरांतील प्रवाशांना परिणाम भोगावा लागणार आहे.
इंडिगोने दिली माहिती
इंडिगोने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (माजी ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट करत सांगितले, “आपली सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. त्यामुळे १३ मे रोजी जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोट येथून होणाऱ्या सर्व फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे तुमच्या प्रवासाच्या योजनांवर परिणाम होईल, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि लवकरच पुढील माहिती दिली जाईल.”
#6ETravelUpdate pic.twitter.com/KnJYNZgOhF
— IndiGo (@IndiGo6E) May 12, 2025
एअर इंडियाचाही निर्णय
एअर इंडियाने देखील एक निवेदन जारी करून सांगितले की, “ताज्या घडामोडी लक्षात घेऊन आणि आपल्या सुरक्षेला प्राधान्य देत जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथील उड्डाणे मंगळवारी, १३ मे रोजी रद्द करण्यात आली आहेत. आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत आणि वेळोवेळी माहिती दिली जाईल.”
पाकिस्तानकडून उफाळलेली आक्रमकता
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून पुन्हा आक्रमक पावले टाकली जात असून, त्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालीमुळे हे हल्ले निष्फळ ठरले. अलीकडेच झालेल्या युद्धविराम करारानंतरही पाकिस्तानकडून छुप्या हालचाली सुरूच आहेत. या अस्थिर आणि तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




