हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bill Gates) सोशल मीडियावर अनेक रील स्टार लोकप्रिय ठरत आहेत. यांपैकी एक म्हणजे नागपूरचा ‘डॉली चायवाला’. डॉली त्याच्या डान्सिंग चहासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. अनेक नागपूरकर आवर्जून डॉलीचा चहा पिण्यासाठी येत असतात. अशातच सोशल मीडियावर डॉलीचा एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. आतापर्यंत डॉलीच्या टपरीवर अनेक लोक चहाचा आस्वाद घेताना दिसली असतील. पण यावेळी डॉलीच्या डान्सिंग चहाचा आस्वाद घ्यायला चक्क बिल गेट्स पोहचल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. सोशल मीडियावर बिल गेट्स आणि डॉली चायवाल्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे.
नागपूरचा ‘डॉली चायवाला’
जगभरात चहाप्रेमी बरेच असतील पण चहा प्रेमाने देणारे फार कमी आहेत. त्यापैकी एक म्हणजे नागपूरचा डॉली चहावाला. नागपूरच्या सदर परिसरात असणाऱ्या प्रसिद्ध डॉली चायवाल्याची गोष्टचं फार वेगळी आहे. डॉलीची चहा तयार करण्याची हटके स्टाईल आणि डायलॉगबाजी सगळ्यांचं लक्ष कायम वेधून घेताना दिसते. यामुळे सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर त्याचे अनेक व्हिडिओ आणि रिल्स कायम व्हायरल होताना दिसतात. इतकंच काय तर डॉलीचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्गसुद्धा आता निर्माण झाला आहे. यातच आता बिल गेट्स (Bill Gates) यांचाही समावेश झाला आहे.
बिल गेट्स यांचा भारत दौरा (Bill Gates)
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते भारतातील विविध गोष्टींचा अनुभव घेत आहेत. यात विविध ठिकाणांसह विविध खाद्य पदार्थांचा देखील समावेश आहे. दरम्यान, नागपूरच्या डॉली चाय वाल्याचा डान्सिंग चहा कसा काय सोडणार नाही का? म्हणून बिल गेट्स यांनी नागपूरमध्ये डॉलीच्या चहाच्या टपरीला भेट दिली. त्यांच्या या खास भेटीचा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो आता व्हायरल होताना दिसतो आहे. असं म्हटलं जातंय की, बिल गेट्स यांनी डॉलीला एका हिल स्टेशनवर देखील आमंत्रित केले आहे.
‘वन चाय प्लीज’
या व्हिडिओत आपण पाहू शकतो की डॉलीने एका हातठेल्यावर गॅसस्टोव्ह मांडला आहे. ज्यावर तो बिल गेट्स यांच्यासमोर आपल्या हटके शैलीत त्यांच्यासाठी चहा तयार करतो. डॉलीची लकब आणि तुफानी स्टाईल पाहून बिल गेट्ससुद्धा भारावून गेल्याचे यात दिसत आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीलाच (Bill Gates) बिल गेट्स हे ‘वन चाय प्लीज’ असे म्हणताना दिसत आहेत. यांनतर त्यांनी डान्सिंग चहाचा आस्वादसुद्धा घेतलाय.
बिल गेट्स यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पुन्हा भारतात आल्याने मी उत्साहीत आहे. जे अनोख्या इनोव्हेशनचे घर आहे’. आतापर्यंत हा व्हिडिओ १९ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून अजूनही हा व्हिडिओ व्हायरल होतोय. (Bill Gates)