हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंद्रजित देशमुख यांचे गाव सांगली जिल्ह्यातील माहुली. माहुली सांगली जिल्ह्यात असले तरी ते सांगली जिल्ह्याच्या शेवटी आहे. देशमुख साहेब जिथं राहतात त्या मळ्यातून आपल्याला सातारा जिल्हा दिसतो.विठ्ठलराव देशमुख हे इंद्रजित साहेबांचे चुलते.त्यांना माहुलकर दादा या नावाने ओळखले जाई. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेले दादा.आमदार दत्ताजीराव देशमुख (महाराज)हे देशमुख साहेबांचे वडील.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून महाराजांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना लोकांनी बिनविरोध निवडून दिले होते. हा राजीनामा आमच्या पिढीला माहिती नाही.कारण कोणीही हा नोंदवून ठेवलेला नाही.आणि तो काळ बातम्यांचा नव्हता.ही गोष्ट आज झाली असती तर दिवसभर पट्ट्या येत राहील्या असत्या. आमदार दत्ताजीराव देशमुख यांनी दिलेला राजीनामा पुन्हा आठवला जेव्हा इंद्रजित देशमुख यांना बदलीसाठी पैसे मागितले म्हणून आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. वडिलांनी महाराष्ट्रासाठी राजीनामा दिला तर मुलाने भ्रष्टव्यवस्थेला शरण जायचं नाही म्हणून राजीनामा दिला.. राजीनामा देणारे आमच्याच तालुक्यातील सुपूत्र…
माहुलकर देशमुखांच्या घराचे आमच्या जुन्या तालुक्याच्या विकासात मोठे योगदान.शाळगावपासून ते पळशी आणि बलवडीपासून ते भुडपर्यंतचा हा मोठा तालूका. या तालुक्यातील प्रत्येक गावात माहुलकर दादांचा गट.गावोगावी शाळा उभारण्यात आणि एसटी सुरू करण्यात दादांचा पुढाकार. आमच्या गावची मराठी शाळा सुरू केल्याचा लोक सांगतात.माहुलकर दादा यांचे भाऊ दत्ताजीराव देशमुख आमदार झाले.तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला जोर आलेला.बेळगाव निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा गावोगावी गर्जत होती याच काळात खानापूरचे आमदार दत्ताजीराव देशमुख यांनी राजीनामा दिला.कसलाही विचार न करता त्यांनी पक्षाकडे राजीनामा दिला. केवढा मोठा त्याग..आज आमदार होण्यासाठी केली जाणारी धडपड पाहिली तर ही गोष्ट खुप मोठी आहे.
याच घराण्यातील समर्थ वारसा इंद्रजित देशमुख यांनी चालवला.समाजकारणात आले. कराडला गटविकास अधिकारी असताना त्यांनी प्रबोधनला सुरुवात केली.गावागावात गेले.ग्रामस्वच्छता अभियान,व्यसनमुक्ती,माणुसकी या विषयावर त्यांनी इतिहासाचे दाखले देत प्रबोधन केले. मी देवराष्ट्र गावात साहेबांचे भाषण पहिल्यांदा ऐकले.त्यांनी सांगितलेली यशवंतराव चव्हाण साहेबांची शाळेतील गोष्ट आजही आठवते.’वर्गात जेव्हा अधिकारी येतात आणि प्रत्येक मुलाला विचारतात. ‘तुला कोण व्हायचं आहे?’एक मुलगा उत्तर देतो ‘मला यशवंतराव चव्हाण व्हायचे आहे..’ हे सांगितल्यावर देवराष्ट्र गावच्या त्या पटांगणात झालेला कडकडाटचा आजही आवाज येतो.
इंद्रजित देशमुखांच्या भाषणांनी शेकडो लोक बदलले.आईच्या हातची भाकरी खायचं सोडून धाब्यावर जाणारी पोर कमी झाली.व्यसनात अडकलेले कितीतरी लोक व्यसनमुक्त झाले. ज्या गावात इंद्रजित देशमुख गेले त्या गावात बदल झाले.ज्या गावात ते गेले नाहीत त्या गावात त्यांची कॅसेट गेली. सायंकाळच्या सुमारास त्यांची कॅसेट वाजू लागली. त्यांचा तो आवाज आणि कळकळीचं बोलणं लोकांना भिडू लागलं.माणसं बदलली.
ग्रामसेवक प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करताना त्यांनी ज्या बॅचला ज्या पद्धतीने धडे दिले ते अनुभव ग्रामसेवक मंडळीच्या कडून ऐकण्याची गरज आहे. प्रशिक्षणच्या शेवटच्या दिवशी ग्रामसेवक निरोप घेताना अक्षरशः रडायचे. एवढा लळा लागलेला असायचा. साहेब पुण्यात आले. यशदा मध्ये त्यांची व्याख्याने ऐकण्याचा योग् आला.जेव्हा लेक्चर संपायच तेव्हा हॉल शांत व्हायचा. हे मी बघितलंय.इथं त्यांनी शेकडो लोकांना लेक्चर दिलं. विचारांना दिशा दिली.
इंद्रजित देशमुख पुण्यात उपायुक्त असताना विधानभवनात मी त्यांना भेटायला गेलो होतो.आमचं बोलणं झालं. त्यांच्याही ऑफीसची वेळ संपली.मला ते म्हणाले,”मला एक ठिकाणी जायचं आहे. सोडता का?” मग मी मोटरसायकलवरून त्याना सोडायला गेलो.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रवेशद्वारावर क्लास वन अधिकारी त्यांची प्रतीक्षा करत उभा होते.आणि आम्ही मोटरसायकलवरून गेलेलो.उपायुक्त असणारा हा माणूस.सुसंस्कृत घराण्यातून आलेला. कधीकाळी तालुक्यातील राजकीय शक्तिकेंद्र असलेलं माहुलकर घराणं. पण इंद्रजित देशमुख यांच्या वागण्यात मात्र कमालीचा साधेपणा. म्हणून हा माणूस भावतो.तत्वासाठी नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडलेला हा बाणेदार माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या महाराजांचा वारसदार म्हणून शोभतो.
इंद्रजित देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या वाणीतून महाराष्ट्रातील तरुणाईला उर्जा मिळावी. दिशा मिळावी ही अपेक्षा आहे.
संपत लक्ष्मण मोरे
9422742925
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’