हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचे सरकार असलं तरी शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे होम पीच असलेल्या कल्याणमध्ये मात्र महायुती मध्ये सर्व काही आलबेल नाही असं म्हंटल जात होते. आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आलाय. जर कल्याण लोकसभा मतदार संघात श्रीकांत शिंदे याना उमेदवारी दिली तर भाजप त्यांचे काम करणार नाही असा ठराव भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganapat Gaikwad) यांनी आयोजित केलेल्या बैठकीत करण्यात आलाय. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचे टेन्शन वाढलं आहे.
गणपत गायकवाड यांनी यापूर्वी सुद्धा शिंदे पिता-पुत्रांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांचे गोळीबार प्रकरण सुद्धा चर्चेत राहिले होते. आताही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच आमदार गायकवाड यांच्या समर्थकांची एक बैठक पार पडली. जर कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंना उमेदवारी दिली गेली तर भाजपचा एकही कार्यकर्ता त्यांच्यासाठी काम करणार नसल्याची आक्रमक भूमिका यावेळी घेण्यात आली. शिंदे उमेदवार असल्यास काम करणार नसल्याचा ठराव देखील भाजच्या कार्यकत्यांनी संमत केल्याची सूत्रांची माहिती दिली आहे.
शिंदेंच्या कार्यकर्त्याचे प्रत्युत्तर –
दरम्यान, भाजपच्या या भूमिकेनंतर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा इशारा दिला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत अपप्रचार करू नये त्यामुळे युतीचं वातावरण बिघडू शकते. युतीचे वातावरण बिघडू नये यासाठी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने निश्चितपणे लक्ष द्यावं आणि त्या दृष्टीने असे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक महायुतीचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली. तर दुसरीकडे जर श्रीकांत शिंदे याना तिकीट मिळाले नाही तर मी राजकारण सोडेन असं विधान शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलं आहे.