“Too little too late” राठोड यांच्या राजीनाम्यावर भातखळकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “Too little too late” अशा शब्दात संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे वर्णन मुंबई भाजपा प्रभारी,आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांचा सुसंस्कृतपणाचा बुरखा इतक्या उशिरा आणि जनमताच्या दबावामुळे घेतलेल्या राजीनाम्यामुळे अखेर गळून पडल्याची टीका त्यांनी याप्रसंगी बोलताना केली.

संजय राठोड यांचा राजीनामा यापूर्वीच घेऊन एफ आय आर दाखल करून या प्रकरणाच्या चौकशीला प्रारंभ करण्याची आवश्यकता होती, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर जनमताच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा घेतला. हा महाराष्ट्राच्या माता भगिनींचा विजय असला तरीसुद्धा या प्रकरणातील सत्य बाहेर येईपर्यंत भारतीय जनता पार्टी या प्रकरणाच्या संदर्भात आंदोलन करत राहील असे सुद्धा आ. भातखळकर यांनी म्हटले आहे. अठरा दिवस उलटून गेल्यानंतरही एफ.आय.आर.दाखल न केल्यामुळे या प्रकरणातले पुरावे नष्ट झाले, याला जबाबदार कोण? हा प्रश्न उद्याच्या विधानसभा अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे आ. भातखळकर यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर संजय राठोड, अरुण राठोड यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये रात्री दोन वाजता गर्भपात करणारा शल्यचिकित्सक या सगळ्यांना कस्टडीमध्ये घेऊन त्यांची स्टेटमेंट आणि चौकशी करण्याची आवश्यकता सुद्धा आ. भातखळकर यांनी प्रतिपादीत केली आहे.

त्याचबरोबर पूजा चव्हाणचा लॅपटॉप, मोबाईल फोन, ऑडिओ क्लिप्स मधील सगळ्या लोकांच्या आवाजाचे नमुने घेऊन फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्याची आवश्यकता होती, ते आता तातडीने पाठवावेत हा सुद्धा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे आ. भातखळकर यांनी म्हटले आहे आणि या प्रकरणाचा त्यातील अंतिम गुन्हेगार सापडेपर्यंत, गुन्हे सिद्ध होईपर्यंत भारतीय जनता पार्टी आपला आंदोलन चालू ठेवेल असेही शेवटी त्यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like