उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री; राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. ते कधी झोपतात, कधी उठतात जनतेला ठाऊकच नसते, अशी टीका राज्याचे भाजप प्रभारी सी. टी. रवी यांनी केली आहे. मुंबई येथे भाजप कार्यकारणीच्या बैठकीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांसहित महाविकास आघाडी सरकार वर ताशेरे ओढले.

हिंमत असेल तर विधानसभा विसर्जित करा आणि निवडणुका घ्या. पुन्हा कोण जिंकेल ते कळेल, असे आव्हान शिवसेनेला सी. टी. रवी यांनी दिले. राज्यातील मुख्यमंत्री किती वाजता उठतो, बसतो हे जनतेला माहीत आहे. हे मुख्यमंत्री पार्टटाइम मुख्यमंत्री आहे. राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फुल टाइम मुख्यमंत्री मिळायला हवा. हिंदुत्व सोडून आता शिवसेना परिवार पार्टी राहिली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार भ्रष्टाचारांचा अड्डा बनला आहे. हे सरकार महाविकास आघाडी नाही तर महाराष्ट्र विनाश आघाडी आहे. जो पक्ष हिंदू रक्षण करण्यासाठी बांधिल होता, तो पक्ष आता परिवार पार्टी झाला आहे. एक बारामती, दुसरी इटली आणि तिसरी ठाकरे कुटुंबाची पार्टी झाली आहे. केवळ घराणेशाही पुढे नेण्यासाठीच काम होत आहे, अशी टीका त्यांनी केली.