शरद पवार राठोडांना पाठीशी घालणार नाहीत; मला मुख्यमंत्र्यांवरही विश्वास आहे – चित्रा वाघ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून विरोधी पक्ष भाजपने सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आपले सरकार शिवशाहीचं असल्याचं सांगतात. मात्र, हे सरकार शिवशाहीचं आहे, हे आता कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे अस चित्रा वाघ म्हणाल्या.

आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप अपेक्षेने बघत आहोत. आम्हाला महाविकासआघाडी सरकारमधील इतर कोणत्या मंत्र्याकडून अपेक्षा नाही, असे चित्रा वाघ यांनी म्हटले. तसेच शक्ती कायद्यात सत्तेत असलेल्या पक्षाचे मंत्री आणि नेत्यांना क्लीन चीट द्यायची, अशी तरतूद आहे का, असा खोचक सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला तर ते संजय राठोडला पाठिशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही मला हा विश्वास असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like