धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्या, अन्यथा…; भाजपाचा मुख्यमंत्र्यांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप रेणू शर्मा या महिलेनं केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेनं ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली असून, धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावरून भाजपा आक्रमक होताना दिसत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे.

नक्की काय लिहिलं आहे पत्रात –

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध ११ जानेवारी रोजी रेणू अशोक शर्मा या महिलेनं ब्लॅकमेल करून अनैसर्गिक कृत्य व बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करून कबूल केलं आहे की, ‘करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्रपरिवार यांना अवगत होती.

सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजप महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल” असे पत्र उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’