हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना खास मुलाखत दिली. या मुलाखतीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, असा थेट हल्ला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केला.
“महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण दसरा मेळाव्याचं भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचं दिसून आलं”, अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.
वर्षभराच्या कालावधीत मराठा आरक्षण, नैसर्गिक आपत्तीने कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांना मिळालेली अपुरी मदत या सर्व मुद्द्यांवरुन फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली. भाजपा कधीही कोणाच्याही परिवारावर हल्ले करत नाही, परंतू मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून संयम दाखवण्याची गरज असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
“हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? तुम्ही संविधानिक पदावर आहे. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. या मुलाखतीत विकासावर अजिबात चर्चा नाही. चर्चा कशावर तर कुणाच्या मागे हात धुवून लागू आणि कुणाची खिचडी शिजवू यावर मुलाखतीचा भर होता. ही मुलाखत मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नव्हती”, असं फडणवीस म्हणाले.
मी म्हणेल की राज्य सरकारचं एका वर्षातलं काम म्हणजे स्थगिती. आमच्या अनेक योजनांना त्यांनी स्थगिती दिली. प्रत्येक कामावर स्थगिती देत सुटलेलं सरकार, असं या सरकारचं वर्णन करावं लागेल. कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका फडणवीस यांनी केली. कोरोनाची दुसरी लाट देशातील काही भागातच आहे. महाराष्ट्रात नाही हे सुदैव असल्याचं फडणवीस म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’