पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत; पडळकरांचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील 12 प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. यवरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना नुकतेच पत्र लिहून पंतप्रधान होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंय. असा जोरदार टोला पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. यासंदर्भात त्यांनी तस पत्रही उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे.

एका पत्राद्वारे आपण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय राजकारणाची नांदी दिली, या बद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन! खासदार संजय राऊत यांना आपणास पंतप्रधान म्हणून बघण्याचे वेध केंव्हाच लागले आहेत आणि त्यांची मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत आपण सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

ज्या बारा नेत्यांनी हे पत्र दिले आहे त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्याशी हयातभर लालबाग, परळपासून मराठी पट्टयात संघर्ष केला आणि मराठी माणसाला आपल्या झेंड्याखाली आणले त्या कम्युनिस्टांचे देशातील दोन बडे नेते डी.राजा आणि सीताराम येचुरी ही आहेत. आपले सर्वेसर्वा मार्गदर्शक अर्थातच शरद पवार आहेत. ज्यांची खिल्ली बाळासाहेबांनी पाकधार्जिणा म्हणून अनेकदा उडविली ते फारुख अब्दुल्लादेखील आहेत. असो , अशी नोंद इतिहासानं तुमच्याबद्दल घेऊ नये म्हणून मी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून तुमच्या असणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव तुम्हाला करवून देत आहे.

राष्ट्रीय राजकारणाकडे आपली अशी वाटचाल सुरू झालेली असताना जे मुद्दे आपण पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले आहेत त्यांच्या अनुषंगाने मी महाराष्ट्रकेंद्रित काही प्रश्न आज आपल्यासमोर उपस्थित करीत आहे.

दिल्लीत पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानासह जो सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प उभारला जाणार आहे,त्याचे बांधकाम तातडीने थांबविण्यात यावे आणि त्याचा पैसा ऑक्सिजन आणि कोरोना लस खरेदी करण्यासाठी व्हावा, अशी मागणी या पत्रात आपण केलेली आहे. उद्धवजी! मग मंत्रालयासमोर 900 रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला मनोरा आमदार निवास प्रकल्प थांबवून आपण तो निधी ऑक्सिजन आणि कोरोना लस खरेदीसाठी करणार आहात का? तसे केल्यास महाराष्ट्र आपले कौतुकच करेल. आधी हा प्रकल्प 600 रुपयांचा होता नंतर त्यात 100+100अशी 300 वाढ करण्यात आली, ती कशासाठी आणि कोणासाठी ? फडणवीस सरकारच्या काळात हे कंत्राट केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सरकारी कंपनीला देण्यात आले होते. आपल्या कार्यकाळात ते काढून घेण्यात आले आणि खासगी कंपनीला दिले जात आहे, हे कशासाठी आणि कोणासाठी ??

पीएम केअर फंड आणि इतर अनअकाऊन्टेड फंडात (म्हणजे काय हे कळले नाही) असलेला निधी व्हॅक्सिन, ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी तत्काळ द्या, अशी मागणी आपण मोदीजींना लिहिलेल्या पत्रात केली आहे. उद्धवजी! ही मागणी करत असतानाच मुख्यमंत्री सहाय्यता निधीत असलेली सर्व रक्कम ही कोरोना लढ्यासाठी देत असल्याचे आपण जाहीर केले तर आपल्या उक्ती व कृतीत कुठलीही तफावत नाही, याचे कौतुकच राज्यातील जनतेला वाटेल.

शेतकरी कायदे रद्द करा आणि तसे केल्यास शेतकरी हे भारतीयाच्या अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी कार्यरत होतील, असे आपण मोदीजींना लिहिलेल्या पत्रात म्हटलेले आहे. उद्धवजी! म्हणजे काय बा? खरेच नाही समजलो. शेतकरी कायदे रद्द करण्याचा आणि शेतकऱ्यांनी अन्न पिकविण्याशी काय संबंध आहे?

उद्धवजी! आपल्यासह बारा नेत्यांनी मोदीजींना लिहिलेले पत्र वाचल्यानंतर महाराष्ट्रासंदर्भात मी हे सवाल केलेले आहेत. आपण उत्तर दिले तर ठीकच, समजा नाही दिले तरी जे समजायचे ते राज्यातील जनता समजूनच जाईल.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment