सोनिया गांधींनीच ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं ; पडळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका उपस्थित झाली होती. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार त्यांच्या कल्याण योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद करावी, अशी सूचना करणारे पत्र सोनिया गांधी यांनी ठाकरेंना लिहिले आहे.  या पत्रावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीचं सरकार अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांवर अन्याय करत असल्याचं मी वेळोवेळी लक्षात आणून दिलं. नोकर भरती, शिक्षक भरती, महावितरणमधील भरती अशा विविध भरतीच्या वेळी त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. UPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयही अन्यायकारकच आहे. या समाजातील घटकांना अनेक सोयीसुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना मुद्दाम तुटपुंजा निधी दिला जातोय. या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन सोनिया गांधी यांनीच सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं आहे असा टोला गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला लगावला.

नक्की काय लिहिलं होतं पत्रात?

महाराष्ट्रातील आदिवासी आणि दलित समाजाच्या विकासासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या दोन पानी पत्राद्वारे त्यांनी आदिवासी आणि दलित विकासासाठी लागणारा निधी देण्याची विनंती ठाकरे सरकारला केली होती. तसेच मोठ्या प्रमाणावर जनकल्याणकारी योजना राबवण्याचा सल्लाही त्यांनी ठाकरे सरकारला दिला होता. भविष्यात आदिवासी, दलित लोकांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, याची शाश्वती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली असल्याची माहिती महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like