पवारांच तोंड शिवलं होतं का? विचारणाऱ्या आशिष शेलारांचं राष्ट्रवादीनं केलं तोंड बंद; दिलं पुराव्यासकट उत्तर

मुंबई । दिल्ली हिंसाचारावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला. दिल्लीत काल झालेल्या हिंसेवर भूमिका का घेतली नाही, असं विचारताना पवार आणि राऊतांचं तोंड शिवलं होतं का?, असा सवाल शेलारांनी केला. आता शेलारांच्या टीकेला राष्ट्रवादीने पुराव्यासकट उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी पवार यांनी मंगळवारी केलेल्या लाईव्ह व्हिडीओची लिंक ट्विट करुन शेलारांना जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. ”जेव्हा शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपले होते का? असा सवाल केला आहे. गुड मॉर्निंग आशिष शेलार, झोपेतून उठा आणि ही लिंक चेक करा.”, असे ट्विट करत शेलारांनाही यामध्ये टॅग केले आहे.

दिल्ली हिंसेवर शरद पवार काय म्हणाले…
दिल्लीत आज घडलेल्या घटनेचे समर्थक करता येणार नाही. मात्र या घटनेमागच्या कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शांततेने बसलेले शेतकरी आज संतप्त झाले आहे. केंद्र सरकारने आपल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे निभावल्या नाहीत. केंद्र सरकारने परिपक्वपणे आणि योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता होती, असे शरद पवार म्हणाले. आजच्या आंदोलनाला खलिस्तानशी जोडणे चुकीचे ठरेल. केंद्राने टोकाची भूमिका सोडून शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक सरकारने करू नये, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.शेतकऱ्यांना न दुखावता सरकारने सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे. बळाचा वापर करून काहीही सिद्ध होणार नाही. केंद्र सरकारने कृषी कायदे लागू करताना सविस्तर चर्चा करायला हवी होती. मात्र दिल्लीत आज घडलेल्या घटनेचे समर्थक करता येणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

पत्रकार परिषद घेऊन शेलारांची पवार-राऊतांवर जोरदार टीका?
आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. शेलार यांनी खासकरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. “कधी काळी आवश्यक वाटल्यास फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार… कालच्या घटनेवर तुम्ही फेसबुक पोस्ट का टाकली नाही… पवारसाहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलिसांच्या बाजूने का आली नाही… आंदोलनात जो वावर आणि वाद पहिल्यापासून चालू आहे त्याचे समर्थन शरद पवार, संजय राऊत यांनी केलं. मग काल हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आता का शिवली?, असा घणाघाती हल्ला शेलार यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like