विधानसभा अध्यक्षपदी असताना आपण हेडमास्तर’ सारखी भूमिका बजावली पण गृहमंत्री झाल्यावर तो दरारा कुठे गेला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत काल भाजप पदाधिकारी जितेन गजारियाने आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “गृहमंत्री साहेब अनेकदा आपल्याला आठवण करून दिली तरी संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. विधानसभा अध्यक्षपदी असताना आपण ‘हेडमास्तर’ सारखी भूमिका बजावली पण गृहमंत्री झाल्यावर तो दरारा कुठे गेला? हेडमास्तर कुठे हरवले आहेत ?, असा सवाल वाघ यांनी केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना थेट पत्र पाठवले आहे. वाघ यांनी म्हंटले आहे की, “मुळात गृहमंत्री म्हणून आपलं काही चालतंय का? सबळ पुरावे असताना कारवाई करत नाही. एवढी हतबलता का आहे? गृहमंत्रालय नेमकं कोणाच्या इशाऱ्यावर काम करतेय. जर जितेन हजारिया दोषी असेल तर राऊत आणि गुलाबराव पाटीलही दोषी आहेत. आपल्याकडून कारवाईची अपेक्षा आहे. संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्या तत्काळ गुन्हा दाखल करावा.”

जितेन गजारिया यांच्या भाषेचं समर्थन करता येणार नाही. महिलाबाबत अपशब्द वापरणाऱ्यांवर कारवाई करायलाच हवी यात दुमत नाही. पण, मग संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना जाहीरपणे शिव्या दिल्या. लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून प्रत्येक घरात आक्षेपार्ह वक्तव्य पोहोचले. त्यावर गृहमंत्रालय मूग गिळून गप्प का बसलंय?” असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला आहे.

तसेच वाघ यांनी पत्रातून महाविकास आघाडी सरकावरही निशाणा साधला आहे. त्यांनी म्हंटले आहे की, गुलाबराव पाटील यांनी महिला खासदाराबद्दल अपशब्द वापरला होता. ते महिला लोकप्रतिनिधींची मानहानी करणारे नाही का? मग गुलाबराव पाटलांवर अद्याप कारवाई का केली नाही? गृहमंत्री साहेब कायदा सर्वांसाठी समान आहे, तर मग तो आपल्या वर्तवणुकीतून दिसत का नाही? गुलाबराव पाटलांना पाठीशी का घातले जात आहे. कारवाई करण्यासाठी आणखी किती दिवस वळसे घेणार आहात? हेच आहे का महाविकास आघाडीचे शिवशाहीर सरकार?” असा सवाल पत्राच्या माध्यमातून वाघ यांनी विचारला आहे.

Leave a Comment