किरीट सोमय्यांनी घेतली समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांची पत्नी तथा अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहले. त्यानंतर आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वानखेडे कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच मलिक यांच्याकडून केल्या जात असलेल्या आरोपांचा निषेधही नोंदविला.

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सायंकाळी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी समीर वानखेडे यांची बहीण यास्मीन वानखेडे आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्यासह पत्नी क्रांती रेडकर उपस्थित होत्या.

किरीट सोमय्या यांनी वानखेडे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्या भेटीबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत. या ट्विटमध्ये सोमय्या यांनी म्हंटले की, समीर वानखेडे यांची बहीण यास्मीन वानखेडे आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज माझी भेट घेतली. त्यानंतर मी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी कुटुंबातील सदस्यांविरुद्ध मंत्र्यांच्या निंदनीय / घाणेरड्या प्रचारामुळे ते व्यथित झाले आहेत. नवाब मलिक यांच्या अशा प्रयत्नांचा मी तीव्र निषेध करतो,” असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.