बाबरी मशीद विध्वंस प्रकरण: कोर्टाने निर्दोष मुक्त केल्यावर लालकृष्ण अडवाणी म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लखनऊच्या विशेष सीबीआय कोर्टाने दिला. भाजपचे जेष्ठ नेते आणि रामजन्मभूमी आंदोलनाचे प्रणेते लालकृष्ण अडवाणीसह सर्व 32 आरोपींची या खटल्यात निर्दोष मुक्त करण्यात आली आहे. कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अडवाणी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून आपण आनंदी असल्याचं म्हटलं आहे. निर्णयामुळे रामजन्मभूमी चळवळीबाबत आपला विश्वास आणि वचनबद्धता सिद्ध होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अडवाणी यांनी म्हटलं आहे की, “बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. या निर्णयामुळे रामजन्मभूमी चळवळीबाबत माझी वैयक्तिक आणि भाजपाचा विश्वास आणि वचनबद्धता सिद्ध होते”.

दरम्यान, बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी निकाल सुनावताना नोंदवलं. तसंच आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सांगण्यात आलं. निकाल सुनावला जात असताना २६ आरोपी कोर्टात हजर होते. लालकृष्ण अडवाणी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती.

सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने सांगितलं की, “विश्व हिंदू परिषदेने यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही भूमिका बजावली नाही”. अज्ञात लोकांनी पाठीमागून दगडफेक केल्याचं निदर्शनात आल्याचं न्यायालयाने यावेळी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी १६ जण खटला सुरु असताना मरण पावले. १६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.