“ कोकण उद्ध्वस्त झालेय, आतातरी…”; दरेकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. यावरून भाजप नेते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आता ढगफुटीमुळे कोकण उध्वस्त झाले आहे. आतातरी याकडे लक्ष देऊन मदत करावी,” अशा शब्दात दरेकरांनी टीका केली आहे.

अगोदरच महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून आरोप केले जात आहेत. अशात चिपळूण, महाडमध्ये पावसाने रौद्ररूप धारण केल्याने २००५ सालची पुनरावृत्ती होणार का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. यावरून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करताना म्हंटले आहे की, या पावसामुळे पूर्णपणे कोकण उद्ध्वस्त झाले आहे. सांगली, सातारासह पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.

गेल्या दहा दिवसांपासून आम्ही सांगत आहोत, की मुंबईची तुंबई झाली. पूर्णपणे मुंबई विस्कळीत झाली आहे. दरडी कोसळून लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडली आहेत. आता तरी जागे व्हा आणि पूर्वनियोजन करा. दुर्दैवाने कुठल्याही प्रकारचे कोकणात येथील स्थानिक प्रशासनाच्यावतीने पूर्वनियोजन झाले नसल्यामुळे कोकणाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला. शहरे पाण्याखाली आली आहेत. महाड शहरात ७ फूट पाणी आहे. चिपळूण, संगमेश्वर सगळ्या कोकणात आज पावसाने पूर्णपणे हैदोस घातला आहे. प्रशासकीय यंत्रणा अत्यंत तोकडी पडली आहे.”, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

You might also like