निवडणूक काळात भाजप आयटी सेल संयोजकाने केलं निवडणूक आयोगाचं काम- पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचे काम भाजप पदाधिकाऱ्याशी संबंधित कंपनीला दिले होते, असा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी केल्यानंतर त्यावरून मोठं वादळ उठलं आहे. निवडणुकीशी संबंधित सोशल मीडियाचं काम निवडणूक आयोगाने एखाद्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कंपनीला देणं ही गंभीर बाब असल्याचे नमूद करत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. साकेत गोखले यांनी पुराव्यासह हा दावा केला आहे. त्याचा आधार घेत पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

निवडणूक आयोगाने दिले भाजप आयटी सेल संयोजकाला कामाचे कंत्राट
२०१९मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय निवडणूक आयोगाचे सोशल मीडियावरील फेसबूक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी देवांग दवे याची असल्याचं समोर आले आहे. देवांग दवे भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता. निवडणूक आयोगाने निष्पक्ष संस्था म्हणून काम करणं अपेक्षित आहे. परंतु हा प्रकार लोकशाहीमधील मुलभूत तत्त्वांना धक्का पोहोचवणारा आहे, असा थेट आरोप पृथ्वाराज चव्हाण यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेसबुकवर निवडणुकी संदर्भात जनजागृती करण्यासाठी Chief Electoral Officer Maharashtra या नावाने पेज सुरु केले होते. या पेजवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संदर्भात अनेक जाहिराती देण्यात आल्या होत्या. हे पेज तयार करताना वापरकर्त्याने स्वत:चा पत्ता दिला होता. “२०२ प्रेसमन हाऊस, विलेपार्ले, मुंबई”. हा पत्ता कोणाचा आहे याबाबत शोध घेतला असता अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणालेत.

भाजप आयटी सेल संभाळणारी कंपनी पाहते सरकारी विभागांचे काम
फडणवीस यांनी सरकारच्या प्रसिद्धीच्या जाहिरातीचे काम “साईनपोस्ट इंडिया’ नावाच्या एका जाहिरात कंपनीस दिले होते. उपरोक्त पत्ता या साईन पोस्ट कंपनीचा आहे. हाच पत्ता ‘सोशल सेंट्रल’ नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारेदेखील वापरला गेला आहे. ही कंपनी देवांग दवे याच्या नावावर असून तो भाजपच्या यूथ विंगच्या (BJYM) आयटी आणि सोशल मीडियाचा राष्ट्रीय संयोजक आहे. देवांग दवेच्या वेबसाइटवर त्याच्या कंपनीच्या ग्राहकांची यादी आहे. त्यानुसार त्याची कंपनी ‘द फियरलेस इंडियन’, ‘सपोर्ट नरेंद्र मोदीं’ इत्यादी पेजेसची फाउंडर असल्याचं समोर येतं. ही पेजेस भाजपाचा प्रचार करणारी असून विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल या पेजेसवरून द्वेष पसरवला जातो. त्याशिवाय इतरही काही सरकारी विभागांचे काम त्याच्या एजन्सीकडून केलं असल्याचं त्याच्या वेबसाईटवरून समोर येते, अशी माहिती पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

घटनेच्या कलम ३२४ अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु यासर्व घटनेवरून असे निदर्शनास येत आहे की महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे. या सर्व घटनेची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे चव्हाण यांनी केली आहे.

‘हा’ फ्रॉड नेमका आहे तरी काय?
देवांग दवे हे ‘आयटी बोर्ड महाराष्ट्र’चे सदस्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावरही चव्हाण यांनी आश्चर्य व्यक्त केलं. माझ्या माहितीत तरी राज्य सरकारचा असा कोणताही आयटी बोर्ड नाही. भाजप सरकारच्या काळात असा काही बोर्ड स्थापन झाला असेल तर ते तपासावे लागेल, असे नमूद करताना हा फ्रॉड नेमका काय आहे, याचा तपास राज्य सरकारने करायला हवा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment