‘सरकारला फडणवीस संताजी-धनाजीसारखे दिसतात’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आणली. त्यामुळे सरकारची असुया आता दिसत असल्याचं, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

ज्याप्रमाणे संताजी-धनाजी सारखे पाण्यात दिसायचे, त्याप्रमाणे सरकारला देवेंद्र फडणवीसांशिवाय कोणीच दिसत नाही, असा टोलाही दरेकर यांनी हाणला आहे. केंद्र सरकारने कोविडच्या परिस्थितीमध्ये काय मदत केली, याचा सविस्तर लेखा-जोखा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचंही दरेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा सरकारने कोरोनाचे नियोजन आणि त्याचं निर्मुलन करण्याकडे अधिक लक्ष आणि वेळ द्यावा, असा सल्लाही प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
संजय राऊत यांनी सामनासाठी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली. फडणवीस दिल्लीत जाऊन काय करताहेत याची मला चिंता नाही. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे तोवर मला चिंता नाही. बाकी फडणवीस हे बोलतच राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

याशिवाय राज्य सरकार मुंबईतील कोरोनाची खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप करणाऱ्यांनाही उद्धव ठाकरे यांनी फटकारले. जागतिक आरोग्य संघटना WHO आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’सारख्या वृत्तपत्रांमध्ये धारावी पॅटर्नचे कौतुक करण्यात आले आहे. तरीही विरोधी पक्षनेते सरकार आकडे लपवत असल्याचा आरोप करतात. कदाचित त्यांच्याकडे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ वैगेरे येत नसेल. नाहीतर आम्ही ‘वॉशिंग्टन पोस्ट’ही मॅनेज केलंय, अशी मिष्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment