व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भाजप मिशन 2024 लोकसभा : सातारा प्रभारीपदी डाॅ. अतुल भोसले यांच्याकडे जबाबदारी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मागील लोकसभा निवडणुकीत देशातील 144 लोकसभा मतदारसंघांत भाजप उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप पक्ष आतापासून तयारी करीत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदार संघाची जबाबदारी  भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व कराड येथील डॉ. अतुल भोसले यांच्यावर ‘प्रभारी’ पदाची जबाबदारी सोपविली आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशासह राज्यातील भाजप नेत्यांनी 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आतापासून तयारी सुरू करण्यात आली आहे. सलग तिसर्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. देशातील 144 लोकसभा मतदारसंघात 2019 साली भाजपा उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या 144 जागांपैकी जास्तीत जास्त जागांवर भाजपा उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी रणनिती आखली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची नुकतीच एक महत्त्वाची बैठक झाली.

या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्यावर सातारा लोकसभा मतदारसंघाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांना मतदारसंघाचे प्रभारी पद देण्यात आले आहे.