सारथीला निधी देता मग ओबीसींच्या ‘महाज्योती’ला निधी देताना राजकारण का?, गोपीचंद पडळकरांचा अजितदादांना सवाल

नागपूर । महाज्योती संस्थेला निधी मिळावा, या मागणीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. लोकसंख्येनुसार ओबीसी समाजाच्या महाज्योतीला 500 कोटी रुपये द्या”, असं गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले. सरकार सारथी संस्थेला त्वरीत निधी देतं, मग महाज्योतीला निधी देताना राजकारण का?, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एका दिवसात सारथी संस्थेला निधी देतात. मग महाज्योती संस्थेला निधी देताना तुमचे हात थरथरतात का?, असा सवाल पडळकर यांनी केला आहे. महाज्योती संस्थेला फडणवीस सरकारने 320 कोटी रुपये दिले होते. पण सध्याच्या राज्य सरकारकडून महाज्योती संस्थेकडे दुर्लक्ष केलं जातंय. या सरकारने जाणीवपूर्वक महाज्योतीला निधी दिला नाही. ओबीसी आणि भटक्यांवर हे सरकार अन्याय करत आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

महाज्योतीला 500 कोटी रुपयांचा निधी द्या. ओबीसी मंत्री 500 कोटी रुपये महाज्योतीला मिळवून देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्याचबरोबर महाज्योतीला निधी देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काहीही बोलत नाहीत, असंदेखील पडळकर यावेळी म्हणाले. सरकारमधील मंत्र्यांनी गेल्या काही दिवसांत जे काही वक्तव्य केलीय, ते बघितल्यावर मराठा आणि ओबीसीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं चित्र दिसतंय. त्याचबरोबर धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी या सरकारने एकही बैठक घेतलेली नाही, अशी टीकादेखील गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

You might also like