हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पोलिसाना धमकी देत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही असा सज्जड दम राणेंनी पोलिसाना दिला. सांगली जिल्ह्यातील पलूस येथे आयोजित शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चा दरम्यान ते लव्ह जिहाद वर बोलत होते. याचवेळी नितेश राणेंनी पोलिसाना लक्ष्य केलं.
उरण आणि धारावी हत्याप्रकरणी पीडितांना न्याय मिळावा आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सांगलीमध्ये या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आपल्या भाषणात नितेश राणे म्हणाले, पोलिस ठाण्यात लव्ह जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासात पोलिस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू . हे सरकार हिंदूचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तुम्हाला जर तुमच्या पोस्टवर मजा येत नसेल तर अशी काही मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की जिथून बायको फोनपण लागणार नाही मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो. नितेश राणे यांनी थेट पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने चर्चाना उधाण आलं आहे.
यापूर्वीही पोलिसांवर निशाणा –
दरम्यान, नितेश राणे यांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या भाषणात पोलिसांना दम दिला आहे. पोलिस काय करणार आहेत, हे फक्त आमचे व्हिडीओ काढतील आणि घरात जाऊन बायकोला दाखवतील असं ते म्हणाले होते. तसेच मी कोणाला घाबरत नाही, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय असंही ते एकदा म्हणाले होते. यावरून मोठा राजकीय गदारोळही पाहायला मिळाला होता. आता नितेश राणेंनी पुनः एकदा पोलिसांना दम दिल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.