हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून सर्व पिकांच्या नुकसानीसाठी सरकारने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. चिखली व बुलडाणा तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या २0 दिवसांत तीन ते चार वेळा अनेक महसुली मंडळात ढग फुटीसारखा पाऊस पडून उडीद मुगनंतर आता सतत पाऊस असल्याने उभ्या सोयाबीनला कोंब फुटल्याने पीकही शेतकर्यांच्या हातातून गेले आहे. चिखली मतदारसंघातील दिवठाणा, नायगाव खुर्द, नायगाव बु, मंगरूळ नवघरे, सावरखेड, डोंगरगाव, पिपरखेड, हाराळखेड, ईसोली, धानोरी या गावात जाऊन मतदार संघाच्या आमदार श्वेता महाले यांनी पीक नुकसानीची पहाणी केली.
यावेळी त्यांनी सर्वे करण्यासाठी अधिकार्यांशी संपर्क केला असता अजूनपयर्ंत शासन किंवा प्रशासन यांच्याकडून सर्वेबाबत कोणतेही आदेश नसल्याची बाब उघडकीस आली. बुलडाणा व चिखली तालुक्यातील अनुक्रमे ७ आणि ११ महसुली मंडळांपैकी ७ महसूल मंडळात ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. तसेच झालेला पाऊस लगतच्या महसुली मंडळातसुद्धा पडलेल्या गावांना बाधित करून गेलेला आहे.
परंतु मंडळातील काही गावात जास्त तर काही गावात कमी पाऊस पडल्याने सरासरी ६५ पेक्षा कमी आलेली आहे. परंतु, त्याठिकाणी सुद्धा खूप नुकसान झालेले आहे. भेटीदरम्यान अनेक नागरिकांनी आ. महाले यांना सोयाबीनच्या सुडीमध्ये पाणी घुसून कोंब फुटले असतील, सोंगलेली सोयाबीन पाण्यात भिजल्याने त्या सोयाबीनला कोंब फुटले असल्याची माहिती दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’