विधानपरिषद निवडणुक : भाजपकडून 6 व्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने 6 व्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे. 20 जून ला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. भाजपकडून विधान परिषदेसाठी काल 5 जणांना उमेदवारी देण्यात आली होती. आता 6 व्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सदाभाऊ खोत हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

सदाभाऊ खोत हे पश्चिम महाराष्ट्रातील आक्रमक शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर जाहीर सभेतून टीका करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. राज्यात युतीचे सरकार असताना सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातही सहभागी होते.

दरम्यान, भाजपकडून विधान परिषदेसाठी यापूर्वी राम शिंदे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, उमा खापरे, आणि , भाजपचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्या उमेदवारी साठी आम्ही खूप प्रयत्न केले मात्र पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला पंकजाताईंना वेगळी काही जबाबदारी सोपवायची असेल. यामुळे त्यांना उमेदवारी दिली नसावी असे विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

भाजपकडे हक्काची 113 मते आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी 27 मतांची आवश्यकता असते. त्यामुळे भाजपचे 4 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात मात्र पाचव्या आणि सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस पाहायला मिळू शकते. भाजपकडे आधीच पाचवा उमेदवार निवडून आणताना काही मते कमी पडत आहेत. त्यातच आता सदाभाऊंच्या रूपाने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment