Sunday, May 28, 2023

लोकल सुरू करण्यापूर्वी रेल्वे विभागाशी चर्चा करायला हवी होती- रावसाहेब दानवे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 15 ऑगस्ट पासून ज्यांनी कोरोनाचे 2 डोस घेतले आहेत त्यांना राज्य सरकार कडून लोकल प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु, हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चाच केली नसल्याचं उघड झालं आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तसे सुतोवाचही केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागतच आहे पण त्यांनी निर्णय घेण्यापूर्वी रेल्वेशी थोडी चर्चा केली असती तर बरं झालं असतं अस दानवे यांनी म्हंटल.

रावसाहेब दानवे म्हणाले, १५ ऑगस्टपासून रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र हा निर्णय जाहीर करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे विभागाशी थोडी चर्चा करायला हवी होती. लोकलच्या कशा प्रकारच्या फेऱ्या सुरू करायच्या, असा निर्णय घेतला असता तर ते प्रवाशांच्या दृष्टीने अधिक सोईचं असतं.

तसेच पुढे बोलताना दानवे म्हणाले की, रेल्वेच्या प्रवास करण्यासाठी क्यूआर कोड लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. हा क्यूआर कोड स्मार्टफोनवर मिळणार आहे. मात्र हा क्युआर कोड तपासण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल. त्यासाठी राज्य सरकराने यंत्रणा उभी करावी. मुंबईकरांच्या सेवेसाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज आहे, असेही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.