भाजपाच्या आ. जयकुमार गोरेंना मुंबई हायकोर्टाचा दणका : जामीन अर्ज फेटाळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

माण- खटाव मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांचा मुंबई हायकोर्टाने जामीन अर्ज आज मंंगळवारी दि. 14 रोजी फेटाळला. येत्या दोन आठवड्यात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मुदतही दिली आहे. त्यामुळे आता जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने आ. जयकुमार गोरे यांना तात्पुरते अटकेपासून संरक्षण दिले होते. तोपर्यंत आ. गोरेंना अटक करता न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने सातारा पोलिसांना दिले होते. या प्रकरणाची 9 जून रोजी पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. आज सकाळी या अर्जावर सुनावणीचा आदेश देण्यात आला असून आ. जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

मुंबई येथे उच्च न्यायालयात रेवते- ढेरे पाटील यांच्या कोर्टात सुनावणी झाली. त्याचा आदेश आज सकाळी हायकोर्टाने दिला. ॲड. मनोज मोहिते, ॲड. वैभव. आर. गायकवाड, ॲड. डी. एस. माळी यांनी फिर्यादीची बाजू मांडली. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20 जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आ. जयकुमार गोरे यांना निवडणूकीमुळे मुदत मिळाली, असून 2 आठवड्यात सुप्रीम कोर्टात अपील करावे लागणार आहे.

आ. जयकुमार गोरे यांच्याबाबतचे हे प्रकरण काय आहे

खटाव तालुक्यातील मायणी येथील मृत पिराजी भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (रा. विरळी ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल ता. माण) आणि अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार करून गुन्हा दाखल केला होता. बनावट कागदपत्रे तयार करुन जमीन हडप केल्याप्रकरणी आ. गोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. वडूज न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आ. गोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली आहे. त्या याचिकेवर तत्कालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने 9 जूनपर्यंत आ. गोरेंना दिलासा दिला होता. मात्र, आज हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळत सुप्रीम कोर्टात जाण्याचा आदेश दिला.

Leave a Comment