सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
बहुजन समाजामध्ये भांडणे लावून समाज संपविण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आहे, असा आरोप मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत केला. ते म्हणाले,”सर्वानुमते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र काहीजण स्वतःची राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी तिथीनुसार जयंती साजरा करण्याचा घाट घालत आहेत. तसेच जाणीवपूर्वक वाद निर्माण करीत आहेत. मात्र लोकांनी इतिहास समजून घेण्याची गरज आहे. साळुंखे म्हणाले, खरे तर मोदी सरकारला बहुजन समाज संपवायचा आहे.”
ते पुढे म्हणाले,” छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे सुख, सुरक्षा यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. मात्र काही सनातनी, कर्मठ लोकांनी शिवरायांना राज्यभिषेक करताना देखील त्रास दिला आणि आज त्यांचेच वारसदार मते मिळविण्यासासठी शिवरायांचा जयजयकार करीत आहेत.” स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी असणारा उद्योग त्यांनी थांबवावा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.