भाजप पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार होतेय? दिग्गजांचा पराभव होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मिशन 45 प्लसचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपचाच राज्यात परफेक्ट कार्यक्रम होतोय.. महायुतीत शिंदेंना आणि अजितदादांना कुठल्या जागा सोडायच्या इथपासून ते उमेदवार कोण असणार? यावर सगळा कंट्रोल भाजपचा असायचा. पण त्याच महायुतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरणाऱ्या भाजपला मेजर झटका बसतोय. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त प्रभाव असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपला एकही जागा निवडून आणता येत नाहीये, असं चित्रं आता क्लिअर होऊ लागलंय. शिंदे आणि अजितदादांना जागा सोडून भाजपने पश्चिम महाराष्ट्रात उरलेल्या 5 जागांवर आपले दिग्गज उमेदवार मैदानात उतरवले… या पाचपैकी एक जागा सोडता इतर चारही जागा 2019 मध्ये भाजपच्या ताब्यात होत्या. पण राजकारण रिव्हर्स गिअर मध्ये पडलं आणि या पाचही जागांवर भाजपला महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून चारी मुंड्या चीत मिळतोय अशी परिस्थिती आहे.. भाजप पश्चिम महाराष्ट्रात लढवत असलेली या पाच जागा कोणत्या? विद्यमान खासदार भाजपचेच असतानाही भाजपवर पश्चिम महाराष्ट्रातून तडीपार होण्याची वेळ का आलीय? तेच साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा सेंटर पॉईंट म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. शेती, उद्योग, सहकार, शिक्षण संस्था आणि कोटींची उलाढाल करणारी अनेक शहर…मुळात राज्याच्या राजकारणावर पश्चिम महाराष्ट्रातीलच नेत्यांचा बराच डॉमिनन्स राहिलाय. म्हणूनच हा पट्टा प्रत्येकच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा असतो… सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी इथं वन साईड निवडून येत असे. या दोन्ही पक्षांचं इथल्या मतदारसंघावर दबदबा होता. पण हळूहळू हा स्पेस भाजपने आणि शिवसेनेने भरून काढला. आणि इथं अटीतटीचे सामने व्हायला लागले. पश्चिम महाराष्ट्र वर्चस्वाखाली आणायचा आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा इथला प्रभाव कमी करायचा हा भाजपच्या राजकारणाचा एक भाग राहिला. म्हणूनच इथून आपल्या पक्षाचे खासदार निवडून आणण्यासाठी भाजपने आपली सारी ताकद खर्ची घातली. मोदी आणि दिल्लीतील मंडळींच्या सभा घेतल्या पण भाजपने या पट्टयातून जे 5 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते. ते सर्वच्या सर्व डेंजर झोनमध्ये असल्याचं आता मतदानानंतर बोललं जातंय. पश्चिम महाराष्ट्रातून भाजपच्या ज्या 5 मतदारसंघातून दांड्या गुल झाल्या आहेत.

BJP पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार होतेय? दिग्गजांचा पराभव होण्याची शक्यता। Lok Sabha Election Result

त्यातली पहिली जागा आहे ती साताऱ्याची…

राष्ट्रवादी नाही तर साताऱ्यात फक्त आपला शब्द चालतो. असं धाडसाने बोलणाऱ्या उदयनराजे यांनी 2019 मध्ये घड्याळाच्या चिन्हावर निवडून येऊन राजीनामा दिला… आणि भाजपचं कमळ हाती घेत पोटनिवडणूक लढवली. पण तेव्हा पवारांच्या पावसातल्या सभेनं दाखवून दिलं की इथं फक्त राष्ट्रवादीचा ब्रँड चालतो. श्रीनिवास पाटील निवडून आले… उदयनराजे आणि भाजपसाठी ही मोठी मानहानी ठरली… म्हणूनच 2024 साठी इथून शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरलं तरी भाजपकडून उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होत नव्हता. कदाचित भाजपला आपण इथून डेंजर झोन मध्ये आहोत याची कल्पना असावी. पण अखेर शेवटच्या यादीत राजेंच्या नावाची घोषणा झाली खरी. पण तोपर्यंत शशिकांत शिंदे यांनी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात तुतारी पोहचवली होती. महायुती एकत्र लढत असली तरी उदयनराजेंच्या प्रचार करण्यात शिंदे आणि अजितदादांच्या आमदारांनी चांगलाच ढील दिला होता. शेवटी राजेंनी एकट्याने ताकद लावली… मोदींनीही राजेंसाठी सभा घेतली… पण प्रचार टू मतदानापर्यंतच्या साताऱ्याच्या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर उदयनराजेंना सलग दुसऱ्यांदा शरद पवारांकडून धोबीपछाड मिळतोय, असं एकूणच वातावरण आहे. त्यामुळे उदयनराजेंसारखा मोहरा फोडून… दोन सहकारी पक्षांचा बॅकअप असतानाही सातारा नशिबात नाहीच, अशी भाजपची परिस्थिती झालीय. असं बोललं तर चुकीचं ठरणार नाही…

पश्चीम महाराष्ट्रातल्या ज्या दुसऱ्या जागेवरून भाजपच्या दांड्या गुल होणार असल्याचं बोललं जातंय तो मतदारसंघ माढ्याचा…

माढा आणि शरद पवार पाडा… असं म्हणत भाजपने 2019 ला इथून भाजपचा खासदार निवडून आणला. माढ्यात जास्तीत जास्त आमदार पेरून भाजपची ताकद बरीच वाढवली. लोकसभेचं बिगुल वाजताच भाजपनं इथून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना रिपीट उमेदवारी जाहीर केली. खरतर निंबाळकरांना उमेदवारी मिळता कमा नये अशी रामराजे आणि मोहिते पाटलांसरख्या महायुतीतल्या दिग्गज नेत्यांची मागणी होती. पण त्याकडे कानाडोळा करत भाजपने आपलं राजकारण पुढे रेटलं. आपल्याला हलक्यात घेतल्यानं मोहिते पाटलांनी स्थानिक नेत्यांना सोबत घेत पक्ष विरोधी भूमिका घेतली.. शरद पवारांची तुतारी हाती घेत भाजपच्या उमेदवाराच्या विरोधातच लढत दिली… धैर्यशील मोहिते पाटील प्लस उत्तमराव जानकर प्लस रामराजे प्लस पवारांच्या सहानुभूतीची मतं असं सगळं जोडून पाहिलं तर माढ्यातून तुतारी फिक्स हे प्रत्येकजण सहजपणे बोलू लागलंय. थोडक्यात भाजपच्या हाता तोंडाचा असणारा खासदारकीचा घास अती आत्मविश्वासामुळे पक्षाला नडला, असं म्हणायला हरकत नाही…मोदींनी दोन सभा घेऊनही माढा हातातून गेला तर भाजपसाठी हा मोठा धक्का असेल, एवढं मात्र नक्की…

पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा गेम झालेली तिसरी जागा आहे ती सोलापूरची…

काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांचं राजकारण संपवत भाजपने इथून सलग दोन टर्म आपला खासदार निवडून आणला. लिंगायत फॅक्टर डोळ्यासमोर ठेवून भाजपला हा विजय सोप्पा झाला. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघातून भाजपने यंदा मात्र वेगळी खेळी खेळत फडणवीसांचे डोक्यावर आशीर्वाद असणाऱ्या राम सातपुते यांना तिकीट देऊन सर्वांना धक्का दिला. तर काँग्रेसकडून वडिलांच्या पराभवचा वचपा काढण्यासाठी शिंदेंची कन्या प्रणिती शिंदे मैदानात उतरल्या. सोलापुरातील भाजपच्या प्रचाराचा बेसलाईन ठरला तो हिंदुत्वाचा अजेंडा… मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वांनी कट्टर हिंदुत्वाचं कार्ड वापरत जाहीर सभांमधून वातावरण तापवलं. पण यंदाची निवडून मूलभूत प्रश्नांवर लढली गेल्याने आणि भाजपला कंटाळलेल्या जनतेची सुप्त लाट शिंदेंच्या पाठीशी उभी राहताना दिसली. दलित, मुस्लिम आणि अल्पसंख्यांक मतं एकत्रितपणे पंजाच्या पाठीशी उभी राहिल्याने 4 तारखेला सोलापुरात पुन्हा एकदा काँग्रेसची शिंदेशाही लोकशाही मार्गाने चालेल, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. अर्थात पहिल्याच टर्म मध्ये आमदार झालेल्या सातपुत्यांना पहिल्याच टर्ममध्ये खासदार होण्याचं भाग्य दिसत नाहीये, असं एकूणच निकालाचा अंदाज सांगतोय…

भाजप पश्चिम महाराष्ट्रातून बॅकफुटला गेलेली चौथी जागा आहे ती म्हणजे सांगलीची…

सलग दोन टर्म संजय काका पाटलांच्या रूपाने भाजपने दबदबा ठेवलेल्या सांगलीवर यंदा विशाल पाटलांचा पंजा चालणार, हे फिक्स समजलं जातं होतं. पण जागावाटपाच्या तिढ्यात काँग्रेसने सांगलीचा बळी दिला आणि ही जागा ठाकरे गटाला सुटली. मतदारसंघात आपली ताकद नसतानाही ठाकरेंनी सांगलीच हट्ट धरत अगदी नव्या नवख्या चंद्रहार पाटलांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं…भाजपकडून संजय पाटलांची उमेदवारी निश्चित होतीच… पण विशाल पाटलांसाठी हा मोठा धक्का असल्यामुळे त्यांनी आघाडीच्या चंद्रावर पाटलांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी बरेच प्रयत्न करूनही सोलुशन निघत नसल्याचं लक्षात येताच त्यांनी सांगलीतून अपक्ष उभ राहत दंड थोपटले…वंचितनेही विशाल पाटलांना पाठिंबा दिल्यानं या तिहेरी लढतीत विशाल पाटलांचं वजन वाढलं. नो मशाल ओन्ली विशाल अशी सहानुभूतीची लाट पुऱ्या मतदारसंघात निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळाली. विश्वजीत कदमांच्या रूपाने काँग्रेसचा मिळालेला मदतीचा छुपा हात, वंचितची हक्काची दलित – मुस्लिम व्होट बँक आणि दादा पाटील घराण्याचं राजकारण यामुळे विशाल पाटलांचा लिफाफा यंदा दिल्लीत जाणार असा कॉन्फिडन्स तसा ठाकरे गट सोडून सर्वांनाच आहे. तसं बघायला गेलं तर आघाडीच्या खात्यात जाणारी एक जागा काँग्रेसच्या शहापणामुळे आणि ठाकरेंच्या हट्टीपणामुळे हातची गेली… विद्यमान खासदार असणाऱ्या सांगलीत भाजपच्या दांड्यागुल झाल्या असल्या तरी विकेट काँग्रेसची गेलीय, असं म्हणायला स्कोप उरतो…

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची जी पाचवी जागा रेड झोनमध्ये आहे तो मतदारसंघ आहे पुण्याचा…

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यावर मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. गिरीश बापटानंतर भाजपची पुण्याची परंपरा कोण चालवणार? असा प्रश्न पडलेला असताना मुरलीधर मोहोळ यांना प्राधान्य देऊन भाजपने अचूक खेळी केली. एकतर मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून पारंपारिक ब्राह्मण मतदारांना भाजपने शांत केलं. त्यात मराठा उमेदवार देऊन जातीय राजकारणाच्या दृष्टीने मोहोळांची उमेदवारी ही चांगली समजली गेली. महापौर पदाचा त्यांना असणारा अनुभव आणि शांत, संयमी नेतृत्व असल्यामुळे पुणे भाजपासाठी वन साईड ठरेल असं बोललं गेलं. पण काँग्रेसने कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपासाठी जायंट किलर ठरलेल्या रवींद्र धंगेकरांना तिकीट देऊन पुण्याची जागा रेसमध्ये आणली. काँग्रेसला पुण्यातून पहिल्यांदाच धिस इज धंगेकर सारखा पॉप्युलर चेहरा मिळाल्यामुळे आणि महाविकास आघाडीने ताकद लावल्यामुळे पुण्याचं मतदान घासून झालं. भाजपचं केडर मजबूत असल्याने आणि युतीनं जीव तोडून काम केल्याने मोहोळ जिंकतील असं बोललं जात असताना धंगेकरांच्या पाठीशी असणारं बहुजन समाजाचं मतदान वर्क आऊट झालं तर पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची पाचवी जागाही रेड झोनमध्ये जावून भाजपला इथून भोपळा मिळू शकतो… तर हे सगळं विश्लेषण ऐकल्यावर पश्चिम महाराष्ट्रातून भाजपला खरंच एकही जागा मिळणार नाही, असं तुम्हाला वाटतं का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.