Monday, February 6, 2023

छत्तीसगढ च्या अचनकमर व्याघ्र प्रकल्प परिसरात काळ्या बिबट्याच्या हालचाली

- Advertisement -

वृत्तसंस्था । पँथर अर्थातच वाघरू, बिबळ्या आणि महाराष्ट्रात विशेषतः बिबट्या नावाने प्रसिद्ध असणारा प्राणी होय. महाराष्ट्राच्या अनेक भागात बिबट्या दिसल्याचे वृत्त असते. मार्जर जातीतील मोठ्या प्राण्यांपैकी एक अशी याची ओळख आहे. अंगावर असणाऱ्या ठिपक्यावरून बिबट्या ओळखला जातो. मात्र यांच्यामध्ये काळा बिबट्या ही जात दुर्मिळ आहे. शरीरातील मेलॅनीन अधिक प्रमाणात असल्याने तो काळा असतो. छत्तीसगढ मधील अचनकमर व्याघ्र प्रकल्प परिसरात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमध्ये २५ मार्च पासून २५ एप्रिल च्या दरम्यान काळया बिबट्याच्या हालचाली दिसून आल्या आहेत.

मार्जर जातीतील अतिशय हुशार आणि चपळ प्राणी म्हणून याची ख्याती आहे. हा प्राणी फार कमी प्रमाणात पाहायला मिळतो. त्याच्या शरीराच्या रंगामुळे जंगलात सुरक्षित राहण्यास त्याला मदत होते. तो एकांतात राहणारा आणि रात्रीची जीवनशैली जगणारा प्राणी आहे. तो निर्भय आणि शक्तिशाली प्राणी आहेच पण त्याच्या वेगामुळेही तो प्रसिद्ध आहे. काळ्या पँथरचा रंग काळा असला तरी जवळून पाहिल्यास त्याच्या शरीरावर ठिपके दिसून येतात.

- Advertisement -

दाट जंगलामध्ये राहणारा काळा बिबट्या भारतात प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात तसेच आसाममध्ये आढळतात. नेपाळ मध्येही यांचे वास्तव्य आहे. दक्षिण आफ्रिकेतील माउंट केनियाच्या जंगलांमध्येही काळा बिबट्या आढळतो.