कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण मतदार संघातील वसंतगड (ता. कराड) ग्रामपंचायत मधील विद्यमान सहा सदस्य, तसेच ग्रामस्थांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे सुपने जिल्हा परिषद गट व पाटण मतदार संघात राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
वसंतगड ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला सत्ता एकहाती सत्तांतर करत मिळाली होती. मागील पंचवार्षिक निवडणूकीत शंभूराज देसाई गटाने सत्तांतर घडविले होते. तर 2020 च्या पंचवार्षिक निवडणुकीत देसाई गटाला उमेदवारही मिळाले नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादीने एकहाती बिनविरोध सत्तांतर केले होते. त्यानंतर अचानक 6 सदस्यांनी राष्ट्रवादीला व पाटणकर गटाला रामराम ठोकत शंभूराज देसाई यांच्या उपस्थित प्रवेश केला.
दौलतनगर मरळी येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेत या सदस्यांनी प्रवेश केला. वसंतगड ग्रामपंचायत सदस्य सुहास दिनकर कदम, योगेश मोहन गुरव, सुरेखा जालिंदर पाचूकते, जालिंदर दादू जामदार, कविता हणमंत निंबाळकर, शारदा आनंदा येडगे या विद्यमान सदस्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थित प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या वसंतगड येथे देसाई मोठा झटका दिला आहे. आता विद्यमान सरपंच अमित नलवडे इतर सदस्याच्या भूमिकेकडे कराड व पाटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.