मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही ५० लाखांचे विमा कवच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार कोरोनाशी संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे सानुग्रह सहाय्य मिळणार आहे. पालिकेच्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. हे विमाकवच केवळ पालिका कर्मचारी नव्हे तर कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून मुंबईकरांची सेवा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्याच महिन्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही कोरोनाच्या संकटकाळात मुंबई महानगरपालिकेने कंत्राटी कामगारांबाबत भेदभाव करु नये, अशी मागणी केली होती. त्यांनाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रोत्साहन भत्ता मिळावा, असे त्यांनी म्हटले होते. त्यांची ही मागणी मान्य झाली नसली तरी ५० लाखांचे विमासंरक्षण मिळणे, ही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येत्या काही दिवसांत मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुंबई मनपाचे आपत्कालीन कर्मचारी जीवावर उदार होऊन लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करत आहेत. हे कर्मचारी आपल्याला २४ तास पाणी, वीज मिळावी यासाठी कार्यरत आहेत. तर शहरात कचऱ्याची, सांडपाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून चतुर्थश्रेणी कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment