हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील परळी येथील उरमोडी धरणात पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. संबंधित युवकांचा शोध रविवारी सायंकाळपर्यंत घेण्यात आला. मात्र, ते आढळून आले नाही. दरम्यान आज पुन्हा रेस्क्यू टीम व पोलिसांनी शोधमोहीम राबविल्याने दुपारी एका युवकाचा मृतदेह त्यांना सापडला. तर दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील परळी येथे असलेल्या उरमोडी धरणात रविवारी दुपारी दोन युवक पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोहताना त्यांना अचानक दम लागला आणि ते बुडाले. त्यांनी पोहायला जाताना धरणाच्या काठावर दोन मोबाईल आणि कपडे ठेवले होते. ते कपडे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतररता नागरिकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना व शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला तसेच संबंधित युवकाच्या कुटूंबियांना दिली. रेस्क्यू टीमने तातडीने धरण परिसरात धाव घेतली.
रात्री उशिरा अंधार असल्यामुळे शोध कार्य करताना अडथळा येत आल्याने सोमवारी सकाळी सातारा तालुका पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके तसेच शिवेंद्रसिंह रेस्क्यू टीम स्थानिक ग्रामस्थ व कातकरी यांच्या मदतीने शोध कार्य सुरू केले. दरम्यान, आज सोमवारी दुपारी एका युवकाचा मृतदेह धरण पात्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी एक तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचाही शोध घेण्याचे काम सुरू आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.