अक्षय कुमारने यूट्यूबरविरोधात ठोकला तब्बल ५०० कोटींचा दावा; ‘हे’ आहे कारण

मुंबई । बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने बिहारच्या एका यूट्यूबरवर तब्बल 500 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. राशिद सिद्दीकी असं या यूट्यूबरचं नाव आहे. त्याने यूट्यूबवरील आपल्या एका व्हिडीओत सुशांत आत्महत्या प्रकरणात अक्षय कुमारवर गंभीर आरोप केले होते. याविरोधातच अक्षयने कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय.

सुशांत प्रकरणात खोटे आरोप केल्याचं सांगत अक्षय कुमारने यूट्यूबर राशिद सिद्दीकीला 500 कोटी रुपयांच्या बदनामीच्या नुकसान भरपाईची नोटीस पाठवली आहे. यूट्यूबर राशिदने आपल्या यूट्यूर चॅनलवरील एका व्हिडीओत मुंबई पोलीस, आदित्य ठाकरे आणि अक्षय कुमारविरोधात अनेक आरोप केले होते. राशिदने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी खोटी माहिती पसरवण्यासाठी 15 लाख रुपये घेतल्याचाही आरोप झालाय. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?
बिहारमध्ये राहणारा राशिद सिद्दीकी सिव्हिल इंजिनिअर आहे आणि FF News नावाचा एक यूट्यूब चॅनल चालवतो. राशिदने आपल्या एका व्हिडीओत म्हटलं आहे, “अक्षय कुमार सुशांत सिंह राजपूतला एम. एस. धोनीसारखे मोठे चित्रपट मिळाल्याने खूश नव्हता. अक्षय कुमारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसांसोबत गुप्त बैठक केली होती. तसेच अक्षय कुमारने रिया चक्रवर्तीला कॅनडाला जाण्यासाठी मदत केली होती.”

राशिदच्या याच आरोपांची गंभीर दखल घेत अक्षय कुमारने त्याला बदनामी केल्याप्रकरणी थेट 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची नोटीस पाठवली. दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. या प्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला 28 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. सध्या ती जामिनावर बाहेर आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक कथित हत्येच्या शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. त्याबाबत अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले. मात्र, दिल्ली एम्सच्या तज्ज्ञांच्या पथकाने ही आत्महत्याच असल्याचा अहवाल दिला.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

You might also like