Sunday, April 2, 2023

अभिनेत्री किरण खेर यांची कॅन्सरशी लढत; ३ तासांच्या बोन सर्जरीनंतर प्रकृती स्थिर

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री व चंढीगड येथील भाजप पक्षाच्या खासदार किरण खेर सध्या कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराशी लढत देत आहेत. कालच्या गुरूवारी त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी त्यांची बोन सर्जरीदेखील करण्यात आली. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेली ही शस्त्रक्रिया तब्बल ३ तास सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार, या शस्त्रक्रियेदरम्यान किरण यांच्या बोनमॅरोतून कॅन्सरच्या पेशी काढण्याचा प्रयत्न केला गेला. या दरम्यान त्यांचे पती अर्थात अभिनेते अनुपम खेर हे पूर्णवेळ रूग्णालयात उपस्थित होते. ‘अमर उजाला’ या माध्यमाने याबाबतचे वृत्त दिले आहे. दरम्यान अनुपम खेर यांनी अद्याप याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.

- Advertisement -

 

६८ वर्षांच्या किरण खेर या गेल्या ५ महिन्यांपासून मल्टीपल मायलोमा नामक कॅन्सर या आजाराशी झुंज देत आहेत. हा एकप्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. गेल्या १ एप्रिलला त्यांना कॅन्सर असल्याची बातमी मीडियासमोर आली होती. मात्र या आजाराचे निदान त्यांना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच झाले होते. गेल्या वर्षी ११ नोव्हेंबरला किरण यांना चंदीगड येथील राहत्या घरी डाव्या हाताला दुखापत झाली होती.

दरम्यान चंदीगडच्या पोस्ट ग्रॅच्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्स येथे त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांना मल्टिपल मायलोमा झाल्याचे निदान झाले. हा कॅन्सर त्यांच्या डाव्या हातापासून उजव्या खांद्यापर्यंत पसरला होता. त्यामुळे गेल्या ४ डिसेंबरला त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी केलेल्या वैद्यकीय चाचण्यांवरून त्यांच्या शरीरातील कॅन्सरचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्या आठवड्यातच अनुपम खेर यांनी किरण यांच्या स्थिर प्रकृतीची माहिती दिली होती. यावेळी ते म्हणाले होते कि, ‘कधी कधी किरण खूप पॉझिटीव्ह असते. पण किमोथेरपीनंतर तिच्यात अनेकदा नैराश्य दाटून येते. आम्ही आमच्यापरीने पूर्ण काळजी घेत आहोत. ती सुद्धा आजाराला खंबीरपणे सामोरी जातेय. डॉक्टरही शर्थीचे प्रयत्न करत आहेत आणि तुमचं प्रेम आणि शुभेच्छादेखील सोबत आहेतच.’