बोंडारवाडी धरणाची रेषा बदलल्यास 54 गावे जनआंदोलन उभारणार :- विजयराव मोकाशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जावली | बोंडारवाडी धरण हे ठरलेल्या मूळ धरण रेषेच्या ठिकाणीच व्हावे, जागा बदलल्यास एक टीएमसी पाणी साठा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे 54 गावांचे नुकसान होईल, हा प्रकल्प रखडल्याने विभागातील युवक नोकरी व्यवसायासाठी मुबई- पुणेकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद पडू लागल्या आहेत. तेव्हा धरणरेषा बदलल्यास 54 गावांच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. भारत पाटणकर यांच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने जनआंदोलन कृती समिती उभे करेल, असा इशारा कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांनी दिला.

जावळी प्रतिष्ठानच्या वतीने पुणे येथील निगडी मध्ये पुणे स्थित जावळीकर नागरिकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जावळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानदेव शेलार, विजय सावले, एकनाथ ओंबळे, राजेंद्र धनावडे, आदिनाथ ओंबळे, नारायण धनावडे, आनंदराव जुनघरे, विनोद शिंगटे, साक्षी उंबरकर, जयश्री शेलार, बजरंग चौधरी, मोहन भणगे, नारायण सुर्वे, अनिल सुर्वे, संतोष कदम, श्रीरंग बैलकर, एकनाथ सपकाळ, संतोष सपकाळ, अशोक पार्टे, लहुराज सुर्वे, विलास शिर्के, सुरेश कासुर्डे, वैभव ओंबळे, सचिन सावले यांची प्रमुख उपस्थिती होती.

नारायण धनावडे म्हणाले, पाणीटंचाईमुळे अनेकांना विस्थापित व्हावे लागले. गेले कित्येक वर्षे पाणी प्रश्न सुटला नाही. जे धरणासाठी काम करतील त्यांना पुणेस्थित जावळीकर निश्चित साथ देतील. त्यामुळे हा प्रश्न सुटल्यास पुणे -मुंबईकडे जाणारा युवकांचा लोंढा थांबेल. यावेळी एकनाथ ओंबळे, विजय सावले, आदिनाथ ओंबळे,साक्षी उंबरकर, जयश्री शेलार,साहेबराव जाधव, विलास सपकाळ, दत्तात्रय लोखंडे, अमोल भिलारे, हणमंत धनावडे, महेंद्र पार्टे आदींनी आपल्या भाषणातून धरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. संतोष सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. एकनाथ सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले. आनंदराव जुनघरे यांनी आभार मानले.