पुस्तक परीक्षण | सोनम पोवार, सुमित वाघमारे
दिल तेरे बिन कहीं लगता नहीं,
वक्त गुजरता नहीं,
क्या यहीं प्यार हैं?
असा प्रश्न तर प्रत्येकालाच तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना पडलेला असतोच असतो! कवयित्री अमृता प्रीतम आणि चित्रकार इमरोज यांनी मात्र या प्रश्नाचं उत्तर जगून दाखवलंय! हीच गोष्ट सांगणारं पुस्तक म्हणजे अमृता इमरोज : एक प्रेमकहाणी!
पुस्तकाच्या प्रस्तावनेतच अमृता प्रीतम आणि इमरोज यांच्या प्रेमाला ‘गुलजार’ सार्थ अशी दोस्तीची उपमा देतात! हे वाचताना ‘ प्यार दोस्ती हैं!’ असं म्हणणारा ‘ कोई मिल गया ‘ मधला शाहरुख आठवतोच! पण पुस्तक वाचताना या वाक्याचा अर्थ कळत जायला लागतो. ते दोघे कधी कधी फिल्मी पद्धतीने एकमेकांचा मृत्यू एकत्रच होणार अशी वचने घेताना पाहून हसूही येतं, तर कधी कधी पुढे दिलेले प्रसंगासारखे प्रसंग आपल्याला त्यांच्या प्रेमातील खोलीची जाणीव करून देतात.
लेखिका लिहिते :
‘ अमृता जिथे जिथे जायच्या, तिथे तिथे इमरोज त्यांच्या सोबतीला असायचे. त्यांना निमंत्रण असेल, तर ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचे, अन्यथा बाहेरच्या हिरवळीवर अथवा गाडीतच बसून असायचे – आपल्या आवडीचं एखादं पुस्तक वाचत! अमृताला जेवणाचं आमंत्रण असेल, तर ते येताना बांधून आणलेलं जेवण हिरवळीवर अथवा गाडीत बसूनच जेवत. त्यात त्यांना कधीही लाज वाटली नाही अथवा काही गैर वाटलं नाही. त्यांचं म्हणणं, ” तुम्ही प्रेम करता तेव्हा तुमचा अहंभाव नाहीसा होतो. ‘प्रेम गली सांकरी जा में दो ना समाए!’ ( प्रेमाची गल्ली अरुंद असते; एकावेळी दोघे तिथून जाऊ शकत नाहीत.)…
अमृताची भेट झाल्यापासून माझ्यातली रागाची भावनाच लुप्त झाली आहे… प्रकाश असेल तिथे अंधार असतो का?”
हे वाचताना नकळत अंतर्मुख व्हायला होतं!
पण केवळ प्रेम हाच या पुस्तकातून ठळकपणे समोर येणारा विषय नव्हे. स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अर्थ समजावून देणारे पुस्तक असेदेखील याचे वर्णन करता येईल. अमृता आणि इमरोज यांची तथाकथित सामाजिक नैतिकतेला झुगारून देऊन माणूस म्हणून जगण्याची वृत्ती या पुस्तकातून दिसून येते. उदाहरणादाखल काही उतारे पाहा :
‘अमृता आणि इमरोझ यांना त्यांच्या नात्याला कोणत्याही प्रकारच्या सामाजिक शिक्कामोर्तबाची गरज वाटली नाही. इमरोझ त्याबद्दल म्हणतात, “आम्ही एकमेकांशी बांधील आहोत, याची समाजापुढे कबुली द्यायची गरजच काय? तुम्ही एकमेकाला बांधील असा वा नसा, कुठल्याच बाबतीत समाज तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. जे निर्णय आपले आपण घेत असतो, ते चुकीचे ठरले, तरी त्याचं खापर आपण दुसऱ्या कोणावर फोडता काम नये.” ‘
किंवा हाही उतारा पाहा..
‘सामाजिक नियम तोडून एक वाईट उदाहरण तुम्ही लोकांसमोर ठेवत आहात या प्रश्नाला उत्तर देताना अमृता म्हणतात, “आम्ही दोघांनी प्रेमाचे बंध अधिक घट्ट केले आहेत. प्रेम हा तर लग्नाचा मुख्य आधार असतो. खरंतर समाजापुढे आम्ही एक अत्यंत ठाशीव, परिणामकारक उदाहरण ठेवलंय. समाजाला आम्ही बळकटच केलंय. आम्ही काय म्हणून या गोष्टीची लाज वाटून घ्यावी? उलट, आमच्याबद्दल चुकीचा समज करून घेतल्याबद्दल समाजालाच लाज वाटायला हवी” ‘
खालील उतारा वाचून अमृता प्रीतम यांची तत्वाशी प्रामाणिक राहून दूरदृष्टीने समाजाचा विचार करण्याची प्रवृत्ती दिसून येते.
” अमृताच्या सर्व कादंबऱ्यांच्या नायिका सत्याच्या शोधात घर सोडून गेल्या. त्यावर त्यांचं मत होतं की ‘चुकीच्या सामाजिक मूल्यांमुळे घरं मोडली असतील, तर सत्याच्या आग्रहासाठी घरांची मोडतोड झाली पाहिजे’ “
या क्षणी एखादी गोष्ट चुकीची दिसत असली तरी तिचे दूरगामी परिणाम समाजाच्या चांगल्यासाठी असू शकतात, याची खात्री पटू लागते. आजची स्त्री स्वतंत्र होऊ शकली त्याची कारणे अशा प्रकारे तत्कालीन शोषण करणाऱ्या सामाजिक रूढी – परंपरा यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या स्त्रियाच आहेत, हेही ठळकपणे जाणवते.
अशा प्रकारे प्रेमाचे आणि माणसाच्या मुक्ततेचे, स्वातंत्र्याचे गीत गाणारे पुस्तक म्हणजे, “अमृता इमरोज : एक प्रेमकहाणी ” !
लेखिका : उमा त्रिलोक
मराठी अनुवाद : अनुराधा पुनर्वसु
पृष्ठ संख्या : १२२
प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
मूळ किंमत : रुपये १००
ऑनलाईन उपलब्ध येथे होईल :
https://www.amazon.in/dp/B00WHSO4K0/ref=cm_sw_r_cp_apa_i_EiMFDbPV5CKXX
अशा इतर अनेक पुस्तकांची माहिती करून घेण्यासाठी आजच आमच्या फेसबुक पेजला भेट द्या!
तळटीप:
पुस्तक विकत घेऊन वाचणं हे अतिशय महत्वाचं आहे, असं आमचं मत आहे. पुस्तकांचा संग्रह असणं ही नुसती अभिमानाची गोष्ट नसते, तर आपल्या आसपासच्या माणसांना, व्यक्तींना त्यांच्या प्रगतीसाठी आपण केलेली मदत असते, यावर आमचा दृढ विश्वास आहे. आपल्या आसपास जर पुस्तके असतील तर नकळत पुस्तके वाचावीशी वाटतात, हा बऱ्याच जणांचा अनुभव असेलच. यातूनच वाचनाची आवड निर्माण व्हायला सुरुवात होते. पुस्तक विकत घेऊन आपण आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी सर्वांगीण विकासाचे पर्यावरण निर्माण करतो. त्यामुळे पुस्तके विकत घ्या, वाचा आणि आपल्याच प्रगतीसाठी हातभार लावा!