पुस्तकांच्या दुनियेत | ऋषिकेश गावडे
लाहोरच्या जात-पात तोडक मंडळ नावाच्या संस्थेने सन १९३५ मधे डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या वार्षिक संमेलनाचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी निमंत्रित केलं. एका सवर्ण हिंदू संघटनेनं आंबेडकरांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ असावी. आंबेडकर म्हणतात की सहसा ते सवर्ण हिंदू नेतृत्व करत असलेल्या चळवळीत सहभागी होत नसत. कारण सामाजिक सुधारणांबद्दलचा त्यांचा आणि अशा चळवळींचा दृष्टीकोन खूप भिन्न होता. तरीही जात-पात तोडक मंडळाच्या आग्रहाखातर त्यांनी हे निमंत्रण स्विकारलं. त्यानंतर या संमेलनासाठीचं अध्यक्षीय भाषण तयार करून त्याच्या एक हजार प्रती छापूनही झाल्या. पण ऐनवेळी या मंडळाकडून आंबेडकरांच्या भाषणातील काही भागावर हरकत घेण्यात आली. आंबेडकर आपले भाषण बदलण्यासाठी तयार झाले नाहीत. त्यामुळे हे संमेलनच रद्द करण्यात आलं. परंतु आधीच छापून झालेल्या त्या भाषणाच्या प्रती आंबेडकरांनी स्वतः प्रकाशित करायचं ठरवलं. आंबेडकरांचं हे कधीही न होवू शकलेलं भाषण म्हणजेच ‘Annihilation of Caste’ अर्थात जातीनिर्मुलन. फक्त पन्नास पानांचं असलेलं हे पुस्तक जातीव्यवस्थेवरचं महत्त्वाचं भाष्य मानलं जातं.
एखाद्या कुशल सर्जनने आजारी शरीराच्या रोगाचं अचूक आणि बेधडक निदान करावं त्याप्रमाणे भीमराव आंबेडकरांनी हिंदु समाजव्यवस्थेची समीक्षा या भाषणात मांडली आहे. त्यांच्या या मांडणीत कुठेच जातीव्यवस्था संपावी म्हणून केलेल्या आर्जवांचा सुर ऐकू येत नाही. ते रोखठोकपणे या व्यवस्थेत काय चुकीचं आहे ते सांगतात. संपुर्ण व्यवस्थाच कशी या दोषांची शिकार ठरली आहे हे ते दाखवून देतात. आणि हे कसं सुधारता येईल याचा मार्ग सांगून पुढे निघून जातात.
जातीव्यवस्थेचे दुष्परिणाम या पुस्तकात बरेच विस्तृतपणे सांगितले आहेत. पण बाबासाहेब फक्त वरवरचे दुष्परिणाम सांगून थांबत नाहीत तर या व्यवस्थेची संरचनात्मक टिकाही त्यांनी या भाषणात केली आहे. जातीव्यवस्थेमुळे फक्त एकाच वर्गाचं नुकसान झालंय असं नाही तर संपूर्ण हिंदु समाजव्यवस्थाच जातीव्यवस्थेने कशी कमकुवत करून टाकलीय हे ते दाखवून देतात. “जातीव्यवस्थेने हिंदूंचे खच्चीकरण करून त्यांना पुर्णपणे विस्कळीत करून टाकलं आहे” असंही ते म्हणतात.
हिंदु धर्मातील प्रत्येक जातीचे हितसंबंध वेगळे आहेत. हे हितसंबंध बऱ्याच वेळा परस्परविरोधी असतात. त्यामुळे ते सर्व जातींना एकत्र येण्यापासून अडवून धरतात. जातीव्यवस्थेच्या या वैशिष्ट्यामुळे प्रत्येक जातीमधे इतर जातींबद्दल अविश्वास आणि असुरक्षितता दिसून येते. या दुरावस्थेचं कारण बाबासाहेब हिंदु समाज ज्या सामुहिक तत्वांवर उभा आहे त्या तत्वांमधे शोधतात. व्यक्तीच्या सद्गुणांना प्रोत्साहन देण्याऐवजी ही समाजव्यवस्था एका ठराविक वर्गाचे हितसंबंध जपणे महत्वाचं मानते. त्यामुळे ती प्रभावहीन झाली आहे असं ते म्हणतात. ही व्यवस्था हिंदुंना संघटीत होवू देत नाही, त्यामुळे लोक एक सक्षम समाज म्हणून किंवा एक राष्ट्र म्हणून एकत्र येण्यास असमर्थ ठरतात.
पुस्तकाच्या सुरुवातीला सामाजिक सुधारणा विरुद्ध राजकीय सुधारणा या पारंपारिक वादाचा परामर्श आंबेडकरांनी घेतला आहे. आधी सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय राजकीय सुधारणा टिकू शकणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.
जातीव्यवस्थेबद्दल समाजवादी विचारधारेच्या मर्यादाही सुरूवातीलाच बाबासाहेबांनी स्पष्ट केल्या आहेत. “समाजवाद्यांना वाटते की संपत्ती हाच सत्तेचा एकमेव उगम स्त्रोत आहे. परंतु भारतीय समाज या बाबतीत युरोपियन समाजापेक्षा वेगळा आहे. इथे सत्तेची अनेक वेगवेगळी साधने दिसून येतात” असं ते म्हणतात. त्यांच्या मतानुसार समाजवादी चळवळ लोकांच्या मनावरील धर्माचा प्रभाव लक्षात घेत नाही.
त्या कळात आर्य समाजाने जातीव्यवस्थेला पर्याय म्हणून “चातुर्वर्ण्य व्यवस्था” सुचवली होती. हे चार वर्ण व्यक्तीच्या जन्मावरून न ठरवता त्याच्या गुणांवरून ठरतील असं आर्य समाज म्हणत असे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या भाषणात या पर्यायाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. हे करताना त्यांनी ग्रीक विचारवंत प्लेटो याच्या न्यायाच्या संकल्पनेची टीका मांडली आहे.
जातीव्यवस्था नष्ट करून तिच्या जागी “स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आधारित असलेला समाज निर्माण करणे हेच माझ्या दृष्टीने आदर्श असेल” असं बाबासाहेब म्हणतात. त्यांनी या तीनही मुल्यांचा त्यांना अपेक्षित असलेला अर्थ सविस्तरपणे स्पष्ट केला आहे.
जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर सहभोजन किंवा आंतरजातीय विवाह हे उपाय जरी उपयोगाचे असले तरी “जातीव्यवस्थेचे निर्मुलन करण्याची खरी चावी शास्त्रांचा अधिकार नाकरणे ही आहे” असं ते म्हणतात. जातीव्यवस्था ही एक मानसिक अवस्था आहे आणि ती धर्माशी जोडलेली आहे. त्यामुळे ती नष्ट करायची असेल तर ‘तुमच्या धर्मात काहीतरी चुकीचं आहे हे हिंदूंना सांगण्याचं धाडस तुम्हाला करावं लागेल’ असं ते म्हणतात.
भाषणाच्या शेवटी बाबासाहेबांनी ‘तत्व’ (principles) आणि ‘नियम’ (rules) यांच्यातला फरक स्पष्ट केला आहे. धर्म हा तत्वांचा भाग असला पाहिजे. त्याने सर्व गोष्टींचे नियम ठरवून देता कामा नये. शास्त्र आणि स्मृतींमधे अडकलेला हिंदु धर्म हा एक नियमांचं गाठोडं बनला आहे त्यामुळे त्याला या स्वरूपातून मुक्त करणं गरजेचं आहे असं ते म्हणतात. हिंदु धर्मामधे कशा प्रकारे सुधारणा करणं शक्य आहे याचा एक कार्यक्रमही त्यांनी इथे दिला आहे. एका सामूहिक परिक्षेद्वारे धर्मगुरूंची नेमणूक करावी हा या कार्यक्रमातला एक नाविन्यपूर्ण भाग आहे.
भाषणाच्या शेवटी, “माझ्यापुरतं विचाराल तर मला जातीनिर्मुलनाचा कार्यक्रम अशक्यप्राय वाटतो” अशी वास्तववादी आणि आव्हानाची खरी जाणीव करून देणारी भूमिका आंबेडकर मांडतात. त्याची कारणेही त्यांनी सांगितली आहेत. हिंदु धर्म सोडून जाण्याच्या आपल्या संकल्पाचा उल्लेखही आंबेडकर जाता जाता या भाषणात करतात.
हे भाषण १९३६ मधे पहिल्यांदा प्रकाशित झालं होतं. त्यानंतर साधारण १५ वर्षांनी जेव्हा स्वतंत्र भारतातचं संविधान स्विकारलं गेलं तेव्हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांना संविधानात मूलभूत स्थान देण्यात आलं. बाबासाहेबांना या संविधानाचं शिल्पकार मानलं जातं. या निमित्ताने त्यांना आपल्या मनातील आदर्श समाजाची पायाभरणी करण्याची संधी मिळाली असं म्हणता येईल. आज जवळपास ८५ वर्षांनंतर या भाषणातील काही संदर्भांमधे बदल झालेला जाणवू शकतो. परंतु जातीव्यवस्था आजही तीचं अस्तित्व राखून आहे. उलट स्वातंत्र्यानंतर मतांच्या राजकारणामुळे जातीव्यवस्था जास्तच बळकट अशी मांडणी काही राजकीय विचारवंत करतात. त्यामुळे हे पुस्तक आजही तितकंच उपयुक्त आहे.
या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीमधे महात्मा गांधी यांनी या भाषणावर ‘यंग इंडिया’ मधे लिहिलेल्या एका लेखाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबत बाबासाहेबांनी गांधीजींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर दिलेलं उत्तरही आहे. या दोन महान नेत्यांमधील थेट वाद – संवाद वाचणं माहिती देणारं त्याचबरोबर मनोरंजकही आहे.
(टीप: या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती कोलंबिया विद्यापिठाच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहे.)
ऋषिकेश गावडे हे मुक्त पत्रकार आहेत. त्यांना विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण करण्याची आवड आहे. त्यांचा संपर्क क्रमांक – 9890894612