मुंबईत माणच्या पाणीदार गावांचे पुस्तक व फिल्मचे आज प्रकाशन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

समन्यायी पाणी वाटपाची संकल्पना मांडणारे क्रांतीबा जोतीबा फुले यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत सातारा जिल्ह्यातील पाणीदार गावात राबविलेल्या पाणी व्यवस्थापन प्रक्रियेचे व्यापक सादरीकरण, पुस्तक अनावरण आणि फिल्मचे प्रकाशन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

कोरो इंडिया, मुंबई व ग्रासरुट व्हॉईस ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र यांच्या माध्यमातून आणि पश्चिम महाराष्ट्रातील 24 संघटनांच्या पुढाकारातून माण तालुक्यातील परतवडी, थदाळे, पानवन,वळई आणि पांगरी या पाच गावांतील लोकांनी लोकसहभाग, महिलांच्या पुढाकारातून शासनाच्या माध्यमातून जल व्यवस्थापन केले. या व्यवस्थापन प्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी लोकसहभागी पाणी व्यवस्थापन प्रक्रियेचे व्यापक सादरीकरण तसेच पुस्तक अनावरण कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात “प्रयोग पाण्याचे-लोकनेतृत्वा”चे या विषयांवर संवाद पार पडणार आहे. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोर्‍हे, जलसंपदा विभागाचे सहसचिव संजीव टाटू, पाणी चळवळीतील ज्येष्ठ नेते संपत पवार, कोरो इंडियाच्या संस्थापक संचालक डॉ.सुजाता खांडेकर, अॅक्वाडॅमचे सहसंचालक उमा असलेकर याची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यावेळी “नवयान ग्रुप जलसा पाण्या”चा या कार्यक्रमाचे सादरीकरणही केले जाणार असून सुर्यकांत कांबळे व स्वाती सावंत हे लोकसहभाग आणि पाणी प्रक्रियेची मांडणी करणार आहेत. सुधारक ओलवे हे सिनेमा स्क्रिनिंग करणार असून मेघा डोंबे व सुरेखा काळेल या महिला नेतृत्व संवाद करणार आहेत. ग्रासरुट व्हॉईस ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र यांच्या माध्यमातून जया कुरणे विविध मागण्या निवेदनाद्वारे मांडणार आहेत. एडेलगिव फाउंडेशन सीईओ नगमा मुल्ला, युनिसेफ वॉश ऑफिसर आनंद घोडके, साम मराठी ब्युरो चिफ रश्मी पुराणिक, मंदार फणसे, अफसाना मुजावर आदींच्या उपस्थितीत पाणी प्रक्रियेतील लोकसहभाग याविषयावरील संवाद होणार आहे.

Leave a Comment