पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके; महापालिकेला साडेसहा लाख पुस्तकांचा पुरवठा

औरंगाबाद | शासनाकडून दरवर्षी अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यावर्षी बालभारती आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून शहरातील शाळांसाठी महापालिकेला 6 लाख 47 हजार पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. शहरातील 490 शाळांमधील 1 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना ही पुस्तके मोफत दिली जाणार आहेत.

यावर्षी शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू झाले आहे. 15 जून ते 30 जून या कालावधीत प्रवेश पंधरवाडा हा उपक्रम राबविण्यात आला. सध्या कोरोनामुळे ऑनलाइन शाळा सुरू आहेत. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान अभ्यासक्रम हा उपक्रम उजळणी वर्ग म्हणून राबविण्यात आला. आता शासनाकडून लगेच मोफत पाठ्यपुस्तके मिळत आहेत. शहरात महापालिकेच्या 71 आणि खासगी अनुदानित 419 शाळा आहेत. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 25 हजार 882 आहे.

या सर्व विद्यार्थ्यांसाठी 7 लाख 46 हजार पुस्तकांची मागणी नोंदवली होती. त्यापैकी 6 लाख 47 हजार पुस्तकांचा साठा महापालिकेला प्राप्त झाला आहे. ही पुस्तके उपायुक्त डॉक्टर संतोष टेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे हे सर्व शिक्षा अभियानातील कर्मचारी व केंद्रीय मुख्याध्यापक यांच्या मदतीने संबंधित शाळांना वाटप करत आहेत.