औरंगाबाद | शहरातील मजूर आणि मनपातील कंत्राटी कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. अर्जुन विठ्ठल पाईकराव वय ५०, (रा. भारतनगर, पुंडलिकनगर) असे कंत्राटी कामगाराचे नाव आहे. तर भीमराव पांडुरंग वाकेकर वय ४८, (रा. अंबरहिल, जटवाडा रोड, हर्सुल) असे विटभट्टीवरील मजूराचे नाव आहे.
महापालिकेत कंत्राटी कामगार असलेले अर्जुन पाईकराव यांनी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास स्वयंपाक खोलीतील छताच्या लोखंडी पाईपला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यावर मुलगा व शेजा-याने त्यांना घाटीत दाखल केले. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच वडिलांचे निधन झाल्याचा विरह सहन न झाल्याने विटभट्टी मजूर भीमराव वाकेकर यांनी आज दुपारी बाराच्या सुमारास बैठक खोलीतील पत्र्याच्या बल्लीला दोरीने गळफास घेतला. सात दिवसांपुर्वीच भीमराव यांच्या वडिलांचे निधन झाले होते.
त्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. आज सकाळी त्यांचा मुलगा ट्रॅक्टर चालविण्यासाठी गेला होता. तर पत्नी रुग्णालयात गेली होती. घरात कोणीही नसताना भीमराव यांनी गळफास घेतला. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद हर्सुल पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सहायक फौजदार आर. बी. शेजूळ करत आहेत.