व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल पंपावर आग लागताच धावू लागले लोक, धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखादं संकट जेव्हा अचानक ओढावतं तेव्हा माणसाला काहीही सुचत नाही. यावेळी आपण इतकं घाबरतो की नेमकं काय करावं हेच कळत नाही. अशात बहुतेक लोक या संकटातून वाचण्यासाठी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही लोक पळ काढण्याऐवजी या संकटाचा धैर्याने सामना करतात. अशीच एक घटना एका पेट्रोल पंपावर पाहायला मिळाली, जिथे अचानक दुचाकीला आग लागली यानंतर आसपास असलेले लोक तिथून पळू लागले. मात्र, एका महिलेनं मोठं धाडस दाखवलं आणि ती आग विझवली.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ चीनमधील एका पेट्रोल पंपावरचा आहे. या पेट्रोल पंपावर अनेक लोक आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी उभे आहेत. इतक्यात तिथे उभा असलेल्या एका गुड रिक्षाच्या पुढील भागाला आग लागते. हे पाहताच चालक लगेचच रिक्षामधून उतरतो आणि आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढतो. इतर लोकही आपला जीव वाचवण्यासाठी तिथून लवकरात लवकर पळ काढतात. मात्र तिथेच उपस्थित असलेली पेट्रोल पंपावरील एक महिला कर्मचारी धाडस दाखवून फायर सिलेंडरच्या मदतीने ती आग विझवते.

या महिलेच्या धाडसाला लोक सलाम करत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत त्याला बहादूर महिलेला सलाम असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या धाडसी महिलेमुळे पेट्रोल पंपावर मोठी दुर्घटना टळली. लोक या महिलेच्या बुद्धीमत्तेचं आणि धाडसाचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.