टीम हॅलो महाराष्ट्र : मनसेचे अधिवेशन येत्या २३ जानेवारीला होणार असून या अधिवेशनात मनसेची पुढील दिशा ठरणार आहे. या आधीच पुण्यामध्ये मनसेच्या पोस्टरबाजीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. चले जाओ, हा हिंदुस्थान आहे, पाकिस्तान किंवा बांगलादेश नाही, अशा विधानाचे पोस्टर पुण्याच्या विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. मनसेला या पोस्टरद्वारे कोणाला इशारा दयायचा आहे, हे मात्र समोर आलेले नाही. या पोस्टरवर मनसेचे पुण्यातील नेते अजय शिंदे यांचे नाव आहे. याबरोबरच सुधीर धावडे आणि राम बोरकर यांचेही नाव आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा २३ जानेवारीला मुंबईतील गोरेगावमध्ये मेळावा घेणार असून राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्व, समान नागरी कायदा याबाबत राज ठाकरे काय भूमिका मांडणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीसोबत जावं की भाजपचा हात धरावा की नेहमीप्रमाणे आपला स्वतंत्र अजेंडा ठेवावा या संभ्रमात मनसे आहे. राज ठाकरे यांच्या मागे ED चे शुक्लकास्ट लागल्यानन्तर मनसेची मोदी सरकार विरोधातील भूमिका मवाळ झाल्याचे दिसून येते. आता राज्यात नव्याने निर्माण झालेल्या सत्ता सूत्राच्या पार्श्वभूमीवर मनसे काय भूमिका घेणार हे मनसेच्या महाअधिवेशनातच कळेल.