मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची माहिती आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला जयंती आहे. त्या निमित्त मनसेचे महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अमित ठाकरे यांनी याआधी मनसेच्या काही आंदोलनात सहभाग घेतला होता. नवी मुंबईत महापालिका कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या मागण्यांविरोधात थाळीनाद मोर्चा मनसेने काढला होता. या मोर्चाचं नेतृत्त्व अमित ठाकरे यांनी केलं होतं. तर रेल्वे आणि आरेतील कारशेडच्या मुद्द्यावरुनही अमित ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती. राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभांना अमित ठाकरे आवर्जुन उपस्थित असतात. मात्र, व्यासपीठावरुन त्यांना सक्रियपणे भाषण केलेलं नाही.
या अधिवेशनात मनसेचा झेंडा बदलून नवीन झेंडा लाँच होण्याची शक्यता आहे. तसेच राज ठाकरे पक्षाची नवीन भूमिका मांडू शकतात. नुकतीच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दिड तास चर्चा झाली. त्यामुळे मनसे भाजप सोबत जाणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मनसे भाजप सोबत जाणार की नाही हे या अधिवेशातूनच स्पष्ट होईल.