मोठी बातमी : केंद्र सरकारचा महाराष्ट्र सरकारला धक्का; भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIAकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशीची मागणी केल्यानंतर आता केंद्र सरकारने या प्रकरणात उडी घेतली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला चांगलाच धक्का दिला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाचा पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहखात्याने याबाबत राज्य सरकारला कळवलं आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसआयटची स्थापन करण्याची मागणी केली होती. त्याबाबतच पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं. मात्र, त्यापूर्वीच केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे सोपवलं आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर तेव्हाच्या भाजप सरकारने काही दलित कार्यकर्ते व विरोधी पक्षनेत्यांचे फोन व व्हॉट्सअॅप मेसेज टॅप केल्याप्रकरणी महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने चौकशीच्या हालचाली सुरू केल्या असतानाच कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास एनआयएने आपल्याकडे घेतल्याने या दोन गोष्टींची काही लिंक आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाविकास आघाडी सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणी झालेल्या कारवाईची फेरचौकशी सुरू केली असतानाच अचानक राष्ट्रीय तपास संस्थेने संबंधित प्रकरणाचा तपास स्वत:कडे घेतल्याने यामागे भाजपचे षडयंत्र असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एनआयएच्या तपासाच्या कक्षेत हे प्रकरण येते हे कळायला दोन वर्षे का लागली?, हा प्रश्न येथे उपस्थित होत असून याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी पक्षाची भूमिका ट्विटरच्या माध्यमातून मांडली आहे.